आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 दिवसांत 28 जणांना डेंग्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात 1 ते 25 जून या कालावधीत डेंग्यूचे 28 रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.

डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. मोकळ्या बाटल्या, फुटलेली भांडी आदी साहित्य घराच्या छतावर टाकले जाते. पावसाळ्यात त्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. पुढे हाच डास रोगाला कारणीभूत ठरतो. शहरासह जिल्ह्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांत दाखल झालेल्या हिवताप रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. डेंग्यूचे निदान झाल्यास संबंधित व्यक्तीच्या गावात आरोग्य यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देत आहेत.

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत दाखल झालेल्या 54 रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 12 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. खासगी रुग्णालयातील 16 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे संबंधित रुग्णालयांनी कळवले आहे, असे प्रभारी हिवताप अधिकारी भाऊसाहेब घुसळे यांनी सांगितले. डेंग्यूच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे. राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे एका रुग्णाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यूू झाला. डेंग्यूच्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या : नगर 4, संगमनेर 5, पाथर्डी 1, राहुरी 3, राहाता 13.

हलगर्जीपणा केल्यास कारवाई
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. याबाबत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपकेंद्रांना सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल. ग्रामपंचायत हद्दीत आम्ही औषध पुरवठा करू, पण धूर फवारणीची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.’’ डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी.

नगरमध्ये चार रुग्ण
नगर शहरातील 12 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी चार रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्याची गरज आहे. शहरात धूरफवारणी सुरू असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.