आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dengue Patients On Treatment Cost Of Lakhs Rupees

डेंग्यू रुग्णांचा उपचारावर लाखो रुपयांचा खर्च, जिल्हा शहरातील रुग्णांची स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नगर शहराच्या आरोग्याचे तीन-तेरा वाजले आहेत. तोकड्या उपाययोजनांमुळे शहरात मागील चार महिन्यांत तब्बल ६६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली.
त्यापैकी ५० पेक्षा अधिक रुग्णांनी उपचारासाठी खासगी रुणालयांत लाखो रुपये खर्च केले. सहाशे ते सातशे डेंग्यूसदृश रुग्ण आजही शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी बोंब सर्वच नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात ठोकली. मात्र, महापालिका प्रशासन ढिम्म प्रशासन अद्याप जागचे हललेले नाही.
ग्रामीण भागातील डेंग्यूची साथ रोखण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने ठोस उपाययोजना सुरू आहेत. नगर शहरात मात्र उलटी स्थिती आहे. महापालिका प्रशासन डेंग्यूवरील उपाययोजना केवळ कागदावरच दाखवत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांत सहाशे ते सातशे डेंग्यूसदृश्य रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालये त्यांच्याकडून हजारो रुपये उकळत आहेत.
डेंग्यूसदृश रुग्णांना १२ ते १५ दिवस अॅडमिट करून खासगी रुग्णालये त्यांना महागड्या औषधांचा ढोस देत आहेत. अनेक डेंग्यूसदृश रुग्ण तर अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. एका रुग्णाला उपचारासाठी तब्बल २५ ते ३० हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. गोरगरीब रुग्ण उसनवारी करून, सोने माेडून, तसेच वेळप्रसंगी कर्ज काढून खासगी रुग्णालयांचे िबल भरत आहेत.

हा सर्व तमाशा महापालिका प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत सर्वच नगरसेवकांनी डेंग्यूबाबत बोंब ठोकली, परंतु मनपाचे ढिम्म प्रशासन जागचे हललेले नाही. शहराचा प्रत्येक भाग, वसाहती, तसेच कॉलन्यांमध्ये डेंग्यचे रुग्ण आहेत. मागील चार महिन्यांत तब्बल ६६ जणांना डेंग्यूची लागण झाली. हे रुग्ण आता बरे असले, तरी त्यांना खासगी रुग्णालयांत उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले. सध्या सहाशे ते सातशे रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मनपाच्या आरोग्य विभागाने या रुग्णांचे साधे रक्ताचे नमुनेदेखील तपासणीसाठी पाठवलेले नाहीत. ज्या भागात संशयित रुग्ण आढळून आले, त्या भागात प्राधान्याने धूर कीटकनाशक फवारणी करण्यात येत असल्याचा खोटा दावाही मनपा प्रशासन करत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, तोकडी यंत्रणा, अधिकारी पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. त्याचा फटका बसून नगरकरांना उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.

रुग्णांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी द्यावेत
शहर,तसेच ग्रामीण भागातील रुग्णांनी डेंग्यू झाल्याचा संशय येताच आपल्या रक्ताचे नमुने जिल्हा हिवताप विभागाकडे तपासणीसाठी द्यावेत. कोणतेही शुल्क घेता त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात येईल. नागरिकांनी स्वत: जागरूक राहून रक्ताचे नमुने द्यावेत. शासकीय एलायझा चाचणी करण्यासाठी एका वेळी ९० रुग्णाच्या नमुन्यांची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी आपल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले, तर त्यांचे रिपोर्टही लवकर मिळतील. जिल्हा हिवताप कार्यालयासह ग्रामीण भागातील आराेग्य केंद्रे, शहरातील मनपाचे आरोग्य केंद्रे तसेच जिल्हा रग्णलायातही रुग्णांना आपल्या रक्ताच्या तपासणसाठी देता येतील.

अशी घ्या काळजी
}एडीसडास चावल्याने होतो डेंग्यू } एडीस डास दिवसा चावतो } स्वच्छ साठलेल्या पाण्यात आढळतो एडीस } घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा } आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा
पाण्याचे साठे पूर्णपणे कोरडे करा } सांडपाणी उघड्यावर सोडू नये } निरुपयोगी वस्तू घर परिसरात ठेवू नका } खिडक्यांना जाळ्या बसवा } मच्छरदाणी डास प्रतिबंधक औषधे वापरा

५२ मलेरिया रुग्ण
१०५ डेंग्यूचे रुग्ण, चिकनगुणिया
४.५ लाख शहराची लोकसंख्या
६६ जणांना डेंग्यूची लागण
६०० पेक्षा अधिक डेंग्यूसदृश रुग्ण
१४ कर्मचारी उपाययोजनांसाठी

खासगी सरकारी चाचण्यांमध्ये मोठा घोळ
शहरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या सहाशे ते सातशेपर्यंत आहे. मनपाने मात्र या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेले नाहीत. मुळात शहरात डेंग्यूचे रुग्ण आहेत, हे मान्य करण्यास मनपा प्रशासन तयार नाही. आम्हाला डेंग्यूचा रुग्ण ठरवण्यासाठी शासनाने काही निर्देश ठरवून दिले आहेत. शासनाची एलायझा चाचणी केल्यानंतरच डेंग्यू अाहे की नाही ते स्पष्ट होते.
खासगी रुग्णालयात करण्यात येणारी एनएस वन या डेंग्यूच्या चाचणीचा रिपोर्ट आम्ही ग्राह्य धरत नसल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. शासकीय खासगी चाचण्यांच्या गोंधळात डेंग्यूच्या रुग्णांचे मात्र मरण होत आहे.