आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Department Of Public Works,Latest News In Divya Matahi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाह्यवळण रस्त्याची अधिकच दुरवस्था, बोजवारा पावसामुळे खड्ड्यांची संख्या वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला बाह्यवळण रस्त्याचा मुसळधार पावसामुळे बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने अवजड वाहतूक पुन्हा शहरातून सुरू झाली आहे. दरम्यान, बाह्यवळण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १४ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आले आहेत.
नगर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. केडगाव, सावेडी, नागापूर हा परिसरही झपाट्याने विस्तारत आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्त्यांची संख्या मात्र कमी आहे. वर्षानुवर्षे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्याने चांदणी चौक, डीएसपी चौक, औरंगाबाद नाका, कोठला स्थानक, जीपीओ चौक, कोठी चौक, माळीवाडा बसस्थानक चौक, स्वस्तिक चौक, सक्कर चौक, कायनेटिक चौक येथे दररोज वाहतूक कोंडी होते.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी अवजड वाहनांकरिता बाह्यवळण रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला २००७-०८ मध्ये सुरुवात झाली. तब्बल सहा वर्षे बाह्यवळण रस्त्याचे काम चालले. १ फेब्रुवारी २०१४ ला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बाह्यवळण रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याने अवजड वाहने वळण रस्त्याने न जाता शहरातून जात आहेत. त्यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी बाह्यवळण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १४ कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या आठवड्यात हा निधी मिळाला.
पावसाळ्यानंतर होणार रस्त्याचे डांबरीकरण
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. पावसामुळे जेथे खड्डे पडले आहेत, ते दुरुस्त केले जातील. अनुज चव्हाण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
रस्ता पैसे खाण्यासाठी...
बाह्यवळण रस्ता पैसे खाण्यासाठी व भ्रष्टाचार करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सरकारने हा रस्ता लोकांसाठी तयार केलेलाच नाही. रस्ता करायचा आणि जागांच्या किमती वाढवून घ्यायच्या, हे त्यांचे उद्योग आहेत. नेप्ती रस्त्यावर रात्री ट्रक लुटले जातात. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर हे सर्व प्रकार थांबवले जातील. अनलि राठोड, आमदार, शिवसेना.