नगर- यश मिळवताना नुसतेच काबाडकष्ट न करता नियोजनपूर्वक योग्य पद्धतीने केलेला अभ्यास आवश्यक असतो. परिश्रमाशिवाय यश मिळत नाही, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले. प्रगत उच्च माध्यमिक विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व निकाल वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष वाल्मिक कुलकर्णी, खजिनदार अॅड. स्वाती नगरकर, एस. बी. रुणवाल, ज्येष्ठ सदस्य दी. ना. जोशी, कार्यकारिणी सदस्य विजया रेखे, प्राचार्य सुनील पंडित, पर्यवेक्षिका हर्षाली देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, प्रगतच्या विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. संस्थेने ही परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून सतत नवीन शिकण्याची जिद्द मनात ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. नीलेश मोरे 84.30, आकांक्षा मुळे 82.15, सौरभ मुळे 70.15 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल 78 टक्के लागला. पूजा गुर्रप 66.61 टक्के गुण घेऊन या शाखेत महाविद्यालयात प्रथम आली, तर प्रियंका देवतरसे द्वितीय व अक्षय सावेकर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी शालेय अहवाल वाचून यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शालेय समितीचे सदस्य अरविंद गोरेगावकर, मुकुंद खांदवे, सचिव अॅड. अरविंद मुळे, मुख्याध्यापिका सुनंदा धिमते, सुनीता काळे, प्राचार्य अंजली राव, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थित होते.