आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis News In Marathi, BJP, Congress, Nationalist Congress

सिंचनाचा पैसा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिजोरीत, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात संगनमताने घोटाळे केले आहेत.शेतकर्‍यांच्या सिंचनाचा पैसा त्यांनी आपल्या तिजोरीत ठेवला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.
महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ मार्केटयार्ड येथे आयोजित प्रचारसभेत फडणवीस बोलत होते. विधान परिषदचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले, विजय औटी, अनिल राठोड, खासदार दिलीप गांधी, भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर, रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आदी या वेळी उपस्थित होते.


फडणवीस म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या किती जागा आल्या. आलेल्या जागा या इनोव्हा गाडीत बसण्या इतक्याच होत्या. आताच्या निवडणुकीत या ‘इनोव्हा पार्टी’चे रूपांतर ‘नॅनो कार’मध्ये होणार आहे.शेतकर्‍यांच्या सिंचनाचे पैसे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिजोरीत गेले आहेत. भाजपने नेहमी शेतकर्‍यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील. या निवडणुकीत महायुतीला कुणीही पराभूत करू शकणार नाही. देशात महागाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या यासारखे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याची ताकद आघाडी नेत्यांत नाही. ते प्रश्न सोडवण्याची ताकद मोदी यांच्यात आहे. महायुतीमागे जनता पूर्णपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिलीपभाऊ तुम्ही निश्चितच निवडून येणार, असे सांगून खासदार गांधींना शुभेच्छा दिल्या. तावडे म्हणाले, विरोधकांकडून नगर अर्बन बँकेबाबत जे बोलले जाते त्याची पूर्ण माहिती पक्षाला असून गांधी त्यात निदरेष आहेत. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीने मात्र उस्मानाबादमधील बँकेत घोटाळा करणारे पद्मसिंह पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली. भाजपमधील काही जणांना फोडण्यात यश मिळाले. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले ते गेले तरी काही फरक पडणार नाही, असा टोला त्यांनी प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता लगावला. रिपाइंचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव म्हणाले, दलितांची प्रश्न काँग्रेसने सोडवली नाही. दलितांचा विश्वासघात करणार्‍यांना धडा शिकवावा. रामदास आठवले यांचा पराभव हा ठरवून केला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला.


गांधी यांचे शक्तिप्रदर्शन
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांनी शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. माळीवाडा बसस्थानक परिसरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्णहार अर्पण करून खासदार गांधी यांनी ढोल-ताशांच्या गरज रॅली काढली. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेच्या सभापती हर्षदा काकडे, सुरेखा विद्ये आदी सहभागी झाले होते. माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, आडते बाजार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात रॅली आली. जिल्हाधिकारी कार्यालयात गांधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार राम शिंदे व शिवाजी कर्डिले उपस्थित होते. त्यानंतर मार्केड यार्ड येथील सभेसाठी सर्व पदाधिकारी रवाना झाले.


मला अटक करून दाखवाच
एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने भाषणात नगर अर्बन बँकेचा उल्लेख करावा, ही दुर्दैवी बाब आहे. दिलीप गांधींनी कोणता गुन्हा केला? गांधींना अटक करून दाखवाच. माझ्यावर टीका करण्याची संधीच नसल्याने विरोधक हा मुद्दा उचलत आहेत. संघटनेने एका ज्यूसवाल्याला खासदार केले. दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेल्या मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीची चर्चा होत नाही. मात्र नरेंद्र मोदी यांच्याच नावाची चर्चा होते. देशाचा विकास हा मोदींच्या नेतृत्वाखालीच होईल, असा देशाला विश्वास वाटतो. मला दुप्पट मताधिक्य देण्याचा शब्द राठोड यांनी दिला आहे. तिसरी संधी देणे ही जनतेच्या हाती आहे. ती संधी तुम्ही द्यावी.’’ दिलीप गांधी, उमेदवार

देश चोरांच्या हातात
लोकसभेच्या निवडणुकीत राठोड काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. गेल्या 25 वर्षांपासून भगवा खाली ठेवला नाही. अनेक आमिषे असतानाही पक्ष बदलण्याचा विचार मनात आला नाही. नगरमध्ये शिवसेनेने सरंक्षण देण्याचे काम केले आहे. उत्तरेचा विकास झाला, मात्र दक्षिणेचा विकास झाला नाही. दक्षिणेतील पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. पॅकेजने समाज ‘पॅक’ झाला आहे. गोध्रा दंगलीबाबत सर्व बोलतात, मात्र अन्य राज्यांत झालेल्या दंगलींबाबत का बोलले जात नाही? महाराष्ट्रात सत्तांतर झाले पाहिजे. देश सध्या चोरांच्या हातात आहे. तो सर्वसामान्यांच्या हातात आला पाहिजे. नगर शहरातून सर्वाधिक मतदान महायुतीला होईल.’’ अनिल राठोड, आमदार


दुहीची बीजे गेल्या निवडणुकीतच..
मागील लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेना आमदार अनिल राठोड यांच्यावर अविश्वास दाखवला होता. राठोड यांनी निवडणुकीत मदत केली नसल्याचे त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवले होते. त्यामुळे दुखावलेल्या राठोड यांनी या वेळी सावध पवित्रा घेतला आहे. या निवडणुकीत मदत करूनही गांधी पुन्हा अविश्वास दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, अशी भीती राठोड यांना आहे.

राठोडांच्या आगमनाने सभेला आली रंगत
प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांचे भाषण सुरू असताना दुपारी 3.50 ला शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांचे सभास्थळी आगमन झाले. राठोड यांचे सभास्थळी आगमन होताच कार्यकर्त्यांनी उभे राहून घोषणा दिल्या. त्यामुळे फडणवीस यांना काही वेळासाठी भाषण थांबवावे लागले. व्यासपीठावर राठोड यांचे आगमन होताच गांधी यांच्या चेहर्‍यावरही स्मितहास्य उमटले.

विरोधी पक्षनेत्यांना पोलिसांनी अडवले
जिल्हाधिकारी कार्यालयात गांधी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर पोलिसांनी सकाळपासूनच बॅरिकेड्स लावले होते. अर्ज दाखल करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास आले. मात्र, रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याने त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर काही मिनिटांनी त्यांना आत प्रवेश देण्यात आला.