आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडी स्वामी यांच्या तोंडाला साईभक्तांनी काळे फासले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - वादग्रस्त विधाने करून साईबाबांच्या देवत्वाला आव्हान देणाऱ्या शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींचे प्रतिनिधी दंडी स्वामी सरस्वती यांना मंगळवारी साईभक्तांनी काळे फासले. दुपारी पोलिस बंदोबस्तात शिर्डीत दाखल झालेले दंडी स्वामी पाच वाजेपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयात बसून होते़ तेथून प्रचंड बंदोबस्तात पोलिस त्यांना बाहेर काढत असताना साईबाबांचा जयजयकार करत एका अज्ञात तरुण साईभक्ताने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. गेल्या २९ जून रोजी दक्षिण भारतातील रमणानंद स्वामींनी साईबाबांच्या देवत्वाच्या समर्थनार्थ शिर्डीत मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, यास परवानगी नाकारण्यात आली होती.
या मेळाव्यासाठी दंडी स्वामी आले होते.
तेव्हा शंकराचार्यांना या विषयावर बाेलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले हाेते. मात्र, त्यांनी दंडी स्वामींना शिर्डीला पाठवले. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. शिवाय दंडी स्वामींना शिर्डीमध्ये येण्यापासून रोखले होते.
प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्याच्या यानिर्णयाविरुद्ध दंडी स्वामींनी औरंगाबाद उच्च न्यायायलयाचे दरवाजे ठोठावले होते़ .यावर न्यायालयाने दंडी स्वामींना शिर्डीत जाण्यास काही अटींवर परवानगी दिली होती. साईबाबा मंदिरात जाणार नाही,माध्यमांशी बोलणार नाही अशांतता निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य करणार नाही या अटींवर दंडी स्वामींना अठ्ठेचाळीस तासांसाठी शिर्डीत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती़.
मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात आलेल्या स्वामींनी तहसीलदार सुभाष दळवी, पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील आदींना आपणास शिर्डीत येण्यापासून रोखल्याबद्दल जाब विचारला. दरम्यान पाचच्या सुमारास स्वामींनी ठाण्यात बसण्याचा निर्णय घेतला. यावेळी बंदोबस्तात त्यांना बाहेर काढत असतांनाच अचानक आलेल्या एका तरूणाने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. दंडी स्वामी यांना पोलिस घेवून जात असताना भक्तांनी साईबाबांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. यानंतर दंडी स्वामी पोलीस संरक्षणात औरंगाबादकडे रवाना झाल्याचे समजते.
हायकोर्टात दिले होते प्रतिज्ञापत्र
दंडीस्वामी गोविंदानंद यांना पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून शिर्डीत येण्यापासून रोखले होते. याविरोधात दंडी स्वामींनी औरंगाबाद उच्च न्यायालयात परवानगी मागितली होती.न्यायालयाने काही अटींवर त्यांना शिर्डीत दाखल होण्यास परवानगी दिली होती. मंदिर परिसरात जाण्याच्या माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करत प्रक्षोभक वक्तव्य करू नये, या अटीबरोबरच ४८ तासांत शिर्डी सोडावी, अशी अट घालून परवानगी दिली होती. न्यायालयाने तसे प्रतिज्ञापत्रही त्यांच्याकडून घेतले होते.
बातम्या आणखी आहेत...