आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काही महिन्यांत धनगरांना आरक्षण; सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहणार नाही. येत्या काही महिन्यांतच धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सूतोवाच बांधकाम व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२० व्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील चोंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. माणकोजी शिंदे स्मृती सभागृहात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष आमदार रामहरी रूपनवर, लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हाधिकारी अनिल कवडे, डाॅ. शिवाजी राऊत, चिमन डांगे, अॅड. अभय आगरकर, महासंघाचे श्रीराम पुंडे, सुभाष सोनवणे, शांतीलाल कोपनर, प्रसाद ढोकरीकर, निवृत्ती करडे, भगवान गडदे महाराज उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, धनगर समाजाला एसटीच्या सवलती देण्यासाठी दिलेला शब्द पाळणार आहे. हे आरक्षण देण्यासाठी पुढची चार वर्षे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही थांबणार नाहीत, तर येत्या ४-५ महिन्यांतच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल. आरक्षण कायद्याच्या कसोटीत बसण्यासाठी अभ्यास करतानाच टाटा सोशल सायन्सेसला हा विषय अभ्यासाला दिला असून या संस्थेचा अहवाल मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सरकार येऊन १० महिने झाले आहेत. त्यातील ४-५ महिने सरकार स्थिर होण्यातच गेले असल्याचे पाटील म्हणाले.
आरक्षण धनगर समाजाचे हक्काचे असून ते मिळवण्यासाठी सत्याग्रही मार्गाने आमचा लढा चालू आहे. याप्रश्नी सरकारने समाजाला जादा वेळ वाट पाहायला लावू नये. चोंडी येथे चालू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना सीना नदीवर मोठा पूल नितीन गडकरी यांनी, तर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा एकनाथ खडसे यांनी केल्याची माहिती अण्णा डांगे यांनी दिली. महासंघाचे अध्यक्ष आमदार रूपनर यांनी धनगर आरक्षणाची आग्रही मागणी केली. कार्यक्रमानंतर पाटील यांनी शिल्पसृष्टीसह अन्य विकासकामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी कवडे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करताना दोनशे वर्षांपूर्वी विहिरी आणि घाट बांधून जनतेच्या कल्याणाची कामे केल्याचे त्यांनी सांगितले.
चोंडी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न
पाटील म्हणाले, अहिल्यादेवींचे जन्मगाव म्हणून विकास निधीची कमतरता भासू देणार नाही. चोंडी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न तसेच ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शासकीय सुटी जाहीर करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. अहिल्यादेवींच्या कार्य कर्तृत्वाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास मंडळ निर्माण करण्याबाबत विचार करू.