आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाज आरक्षण हक्क परिषद 9 जुलैला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - धनगर समाजाला केंद्र शासनाने 1956 मध्ये दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आरक्षण हक्क परिषद घेण्यात येणार आहे. ही परिषद 9 जुलैला गुलमोहर रस्त्यावरील कोहिनूर कार्यालयात होणार आहे.
धनगर समाजाची राज्यात एक कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या आहे.
केंद्र सरकारने 1956 व 76 मध्ये राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगरऐवजी धनगड असे नमूद करून आरक्षण दिले. भाषिक अनुवादातून झालेल्या चुकीनंतर राज्यात धनगड नव्हे, तर धनगर असा समाज असल्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता तरी तशी शिफारस करावी व केंद्र सरकारने त्यानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आरक्षण कृती समितीने केली आहे.

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश होण्यास आदिवासींचा प्रचंड विरोध आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांची भेट घेऊन कृती समितीने या राज्यव्यापी आंदोलनाला वेगळी दिशा दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. विधिमंडळात यावर अनेकदा चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिचड यांनी धनगर समाज आरक्षण हक्क परिषदेला उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन कृती समितीने केले.

यावेळी आरक्षण परिषदेचे विजय तमनर, गंगाधर तमनर, दिगंबर ढवण, ज्ञानेश्वर बाचकर, निशांत दातीर, बापूसाहेब बाचकर, सोमनाथ बाचकर, चंद्रकांत तागड, बाळासाहेब मतकर, राजेंद्र तागड, सुरेश तमनर, ज्ञानेश्वर बरे आदी उपस्थित होते.