आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशोत्सव, नवरात्रीत आता घुमणार ‘नगरी ढोल’चा आव्वाज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाला अद्याप दोन महिने अवकाश असला, तरी या दोन्ही उत्सवांची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. आजवर बाप्पांना वाजत-गाजत आणण्यासाठी नाशिकचे ढोल राज्यभर प्रसिद्ध होते. गणेशोत्सवाची मिरवणूक अन् ‘नाशिक ढोल’ हे जणू एक सूत्रच झाले होते. आता मात्र गणेशोत्सवात जोश आणण्यासाठी खास ‘नगरी ढोल’ सेवेत येत आहे. शहरात यावर्षी जवळपास तीन ते चार ढोलपथके तयारीला लागली आहेत.
नाशिकचा ढोल महाराष्ट्रासह परराज्यांमध्येही प्रसिद्ध आहे. कार्यक्रम कोणताही असो, ‘नाशिक ढोल’ला सगळीकडेच मागणी असते. गणपतीच्या दहा दिवसांत ‘नाशिक ढोल’ला प्रचंड मागणी असते. मुंबई-पुण्यासह सर्वच शहरांत या ढोल पथकांच्या तारखा अगोदरच ‘बुक’ असतात. त्यामुळे गेल्या वर्षीपासून खुद्द नाशिक शहरातच ढोल पथकांची कमतरता जाणवत होती. यात मागे राहतील ते नगरकर कसले? गेल्या वर्षीपासून ‘नगरी ढोल’ चा आव्वाज घुमत आहे.

संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या मिरवणुकीची सुरुवात ‘नाशिक ढोल’ने झाली नाही, असे मंडळ शोधून सापडणे दुरापास्त असते. गणेशोत्सवात नाशिक ढोल घुमला नाही, असे होतच नाही. मुंबई-पुण्यात, तर गणपतीच काय पण रमजानमध्येही नाशिक ढोलची वेगळीच ‘के्रझ’ असते.

नाशिकपाठोपाठ आता नगरकर ढोल पथकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. त्यासाठी खास ‘नगरी ढोल’ पथकाची स्थापना झाली आहे. त्यामुळे लवकरच शहराच्या तेजोमय संगीत परंपरेत भर घालणार्‍या या ‘नगरी ढोल’ पथकाच्या तालावर नगरकरांची पावले आता थिरकणार आहेत. गेल्या वर्षी ‘रिदम प्रतिष्ठान’ने पुढाकार घेत ‘नगरी ढोल’ पथक स्थापन केले होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व शिवजयंती मिरवणुकीप्रमाणे नगरची शान वाढवणार आहे. यंदा ‘तालयोगी’ पथकाची नुकतीच स्थापना झाली आहे.
मुलींनाही प्राधान्य
रिदम प्रतिष्ठानने गेल्या वर्षी सुरू केलेल्या ढोल पथकात 70 मुले-मुली सहभागी झाली होती. या पथकामध्ये मुलींनाही प्राधान्य दिले होते. अलीकडेच नव्याने स्थापन झालेल्या ‘तालयोगी’ ढोल पथकातही 20 मुलींसह 70 वादकांचा सहभाग आहे. आणखी एक ढोल पथक युवतींची जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे ढोल पथकात मुलांबरोबर मुलींनाही प्राधान्य देण्यात येत आहे.
नाव उंचावणार
ढोल हे पारंपरिक वाद्य आहे. ढोल वातावरणात स्फूर्ती निर्माण करणारे तालवाद्य आहे. पुणे व मुंबईनंतर नगरमध्येही ही संकल्पना चांगल्या प्रकारे रुजत आहे, हे उल्लेखनीय आहे. ढोल शिकताना वादकांनी त्यातील तालबद्धता शिकावी. चांगला सराव करावा. तसेच ही कला शिकत असताना स्वत:च्या अंगी शिस्त बाळगावी.’’
मधुसूदन मुळे, मार्गदर्शक, नगर.
फोटो - शहरातील रुद्रनाथ ढोल पथकात सहभागी चिमुरडा.