आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘धूम स्टाइल’ चोरट्यांचा उच्छाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-‘धूम स्टाइल’ने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणार्‍या चोरट्यांना उपनगरांमध्ये मोकळे रान मिळाले आहे. गुरुवारी सकाळी वर्दळीच्या रस्त्यावर पाहुण्या महिलेच्या गळ्यातील दागिने या चोरट्यांनी हिसकावले. सातत्याने वाढणार्‍या या घटना तोफखाना पोलिसांसमोर आव्हान बनण्याऐवजी नागरिकांच्या दृष्टीने पोलिसच अस्तित्वहीन झाले आहेत. पोलिसांचा नाकर्तेपणाच चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नगरकरांमधून उमटत आहेत.

सावेडी उपनगर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणार्‍या चोरट्यांसाठी नंदनवन ठरत आहे. पाइपलाइन रस्ता, गुलमोहोर रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक व या परिसरातील इतर रस्त्यांवर सातत्याने अशा घटना घडत आहेत. मात्र, पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी सापडायला तयार नाहीत. या चोरट्यांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना आखल्याचे पोलिस प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र, या उपाययोजनांची परिणामकारकता दृश्य स्वरूपात पुढे येण्यास तयार नाही. दागिने हिसकवण्याच्या जिल्ह्यातील सर्वाधिक घटनांची नोंद तोफखाना पोलिस ठाण्यात होत आहे. पायी जाणार्‍याच नव्हे, तर दुचाकीवरून जाणार्‍या महिलाही असुरक्षित आहेत.

गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास पाइपलाइन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिरासमोरच्या अष्टविनायक कॉलनीत ‘धूम स्टाइल’ चोरीची घटना घडली. पुष्पा शंकर आल्हे (63, राहणार कोंढवा, मार्केट यार्ड, पुणे) या त्यांच्या पतीसमवेत नातेवाईक अशोक अनमल यांच्या घरी जात होत्या. पाठीमागून पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. ‘आम्ही स्थानिक नाही, तर पुण्याचे आहोत. पत्ता माहिती नाही’, असे आल्हे दाम्पत्य सांगत असतानाच पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पुष्पा आल्हे यांच्या गळ्यात हात घातला. ब्लेडसारख्या वस्तूने चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण क्षणात तोडले. काही कळण्याच्या आत गंठण हिसकावून चोरट्यांनी भरधाव वेगात मनमाड रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली.

पुष्पा आल्हे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आल्हे दाम्पत्य व प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांच्या मोटारसायकलचा अर्धवट क्रमांक पोलिसांना मिळाला आहे.

महिलाच धावल्या मदतीला
25 ते 30 जण या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. इतकी वर्दळ असतानाही चोरट्यांनी दागिने हिसकावण्याचे धाडस दाखवले. आल्हे दाम्पत्याची आरडाओरड ऐकून जवळच असलेल्या 6 ते 7 महिला मदतीसाठी पुढे सरसावल्या. यातील दोन महिला चोरट्यांच्या मोटारसायकलसमोरच झोपल्या. मात्र, त्यांना हुलकावणी देत चोरट्यांनी धूम ठोकली. जाताना निर्लज्जपणे त्यांनी ‘बाय-बाय’चा इशारा केल्याची माहिती या महिलांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

सीसीटीव्हीची आशा मावळली
तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारात समोरच्या बाजूचे चित्रण करणारे दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या मंदिरासमोरूनच चोरट्यांनी पोबारा केला होता. त्यामुळे चोरट्यांचे चित्रीकरण यात झाल्याची आशा पोलिसांना होती. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हे कॅमेरे बंद असल्याची माहिती देण्यात आली अन् पोलिसांच्या हाती काहीही पडू शकले नाही.

दरम्यान, तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात पन्नास महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यात आले आहे. यातील एकाही चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. तत्पूर्वी र्शीरामपूरच्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून अकरा गुन्ह्यातील तीस तोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. चार ते पाच वर्षांपासून तपासावर असलेल्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय आहे.

गस्त सुरू आहे
नगर शहरात विशेषत: उपनगरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावण्याच्या घटना रोखण्यासाठी गस्त सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती भागात तीन ठिकाणी ‘फिक्स पॉईंट’ लावण्यात आले आहेत. धूम स्टाइलने चोरी करणार्‍या चोरट्यांना शोधण्याच्या कामासाठी सहा पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चोर्‍यांना आळा बसेल. ’’ विजय पवार, पोलिस निरीक्षक.

दुसरे पाहुणे ठरले शिकार
अनमल यांच्याकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पुण्याचे आल्हे हे येऊ शकले नव्हते. त्यामुळे गुरुवारी ते भेटण्यासाठी येत होते. तत्पूर्वी अनमल यांच्या भावाकडे कार्यक्रमासाठी सोलापूरहून आलेल्या पाहुण्या महिलेचे दागिने ‘धूम स्टाइल’ चोरट्यांनी याच परिसरातून हिसकावले होते. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुण्याच्या पाहुण्यांच्या बाबतीत ही घटना घडली.

पोलिसांची भीतीच नाही
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणार्‍या चोरट्यांना भीतीच नाही. पोलिसांकडून पकडले पोलिसांची जरब असती तर दिवसा महिलांच्या गळ्यात हात टाकण्याची त्यांची हिंमत झाली नसती. पोलिसांना जाब विचारणाराही कुणी नसल्याने त्यांना अभय मिळत आहे.’’ अशोक अनमल, नागरिक.

नाकर्तेपणा जबाबदार
महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे महिलांवर खोटे मंगळसूत्र घालण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारांना दहशत बसेल अशी कारवाई पोलिसांनी केली तरच अशा घटनांना आळा बसेल. ’’ प्रमिला राऊत, गृहिणी.

‘त्या’ वाहनांवर बंदी हवी
तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलांच्या भावनांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलांनाच पोलिस विचित्र प्रश्न विचारुन त्रास देतात. चौकाचौकांमध्ये साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात यावे. विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलींना शहरात बंदी घालावी.’’ सुनंदा गिरमे, गृहिणी.

तपासाला प्राधान्य द्यावे
मंगळसत्रू चोरीच्या तपासाकडे पोलिस दुर्लक्ष करतात. पोलिसांनी तपासाला प्राधान्य दिले पाहिजे. पोलिसांसह नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. चोरट्यांना कडक शिक्षा झाल्याशिवाय अशाप्रकारांना आळा बसणार नाही. मुख्य चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे हवेत.’’ छाया रसाळ, गृहिणी.

सौभाग्याचं लेणंच वेठीला
पोलिसांनी कितीही जनजागृतीचा दावा केला असला, तरी सौभ्याग्याचं लेणं म्हणून सोन्याचा दागिना घालण्याची सर्वच स्तरातील महिलांची मानसिकता आहे. नेमक्या याच मनोवृत्तीचा चोरटे फायदा उचलत आहेत. या चोरट्यांना नमवण्यासाठी बेंटेक्सचे दागिने हा उत्तम उपाय ठरू शकतो. मात्र, किमान एक तरी सोन्याचा दागिना सोन्याचाच हवा ही विवाहित महिलांची मनोवृत्ती बदलणे अवघड ठरत आहे.