आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - किडनी निकामी झाल्याने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिसची सुविधा 15 जुलैपासून उपलब्ध होत आहे. गंभीर अवस्थेतील अर्भकांसाठीचा अतिदक्षता विभागही 15 दिवसांत कार्यान्वित होणार आहे.

राज्य सरकारच्या अनुदानातून राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांत डायलिसिस यंत्रणा बसवण्यात येत आहे. इतर रुग्णालयांच्या तुलनेत नगर जिल्हा रुग्णालयाने युद्धपातळीवर काम करून डायलिसिस यंत्रणा उभारण्यात आघाडी घेतली आहे. शहरात काही खासगी व ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांना एकावेळी डायलिसिससाठी सातशे ते एक हजार रुपये खर्च करावा लागतो. काही रुग्णांना आठवड्यातून दोनदा डायलिसिसची गरज भासते. खासगी रुग्णालयांतील खर्च सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेरचा ठरतो. जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभाग अशा रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारकडून मिळालेल्या साडेनऊ कोटींच्या अनुदानातील काही रक्कम खर्च करून या विभागासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाशेजारी असणार्‍या इमारतीत सध्या हा विभाग तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. डायलिसिस यंत्रणा व चार बेडची व्यवस्था तेथे आहे. या विभागात एका दिवसांत चार रुग्णांना डायलिसिस घेता येईल.

जननी-शिशू सुरक्षा योजनेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रसुतीसाठी येणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रसुती वॉर्ड कायमच भरलेला असतो. या वॉर्डाची क्षमता 50 वरून 100 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आणखी पन्नास खाटांचा स्वतंत्र प्रसुती वॉर्ड बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून वर्षभरात हा वॉर्ड कार्यान्वित होणार आहे. अतिगंभीर व गंभीर अर्भकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या अतिदक्षता विभागाचे काम पूर्ण झाले आहे. 15 जुलैपासून हा विभाग कार्यान्वित होईल. 14 अर्भकांना ठेवण्याची यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आली आहे. कमी वजन, वेळेपूर्वी प्रसूती, प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत यामुळे अर्भक दगावण्याची भीती असते.

आरोग्य सचिवांकडून तपासणी
आरोग्य विभागाच्या सचिव मिता लोचन यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयाची तपासणी केली. प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी बारकाईने पाहणी केली. संबंधित विभागातील डॉक्टर व कर्मचार्‍यांशीही त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. रुग्णांसाठी तयार करण्यात येणार्‍या भोजनाची चवही त्यांनी चाखली. तब्बल अडीच तास तपासणी करून त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर व त्यांच्या टीमचे कौतुक केले.

रुग्णालय व परिसर चकाचक
सचिव तपासणीसाठी येणार असल्याने रुग्णालय प्रशासनाने जोरदार तयारी केली होती. गेल्या आठ दिवसांपासून साफसफाई, रंगरंगोटी करून जिल्हा रुग्णालय व परिसर चकाचक करण्यात आला. त्यामुळे एरवी दिसणारे रुग्णालयाचे स्वरूप बुधवारी पूर्णपणे पालटले. गेल्या दहा वर्षांपासून बंद पडलेली लिफ्टही यानिमित्ताने सुरू झाली. रुग्णालयाचे पालटलेले हे स्वरूप रुग्णांसाठी सुखद धक्का ठरला.