आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील तिसर्‍या डिजिटल तारांगणाचे नगरमध्ये रविवारी उद्घाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहरापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रस्त्यावरील धनगरवाडी येथे डिजिटल तारांगण (प्लॅनेटोरियम) उभारण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एफर्ट्स अकॅडमीने त्याची उभारणी केली आहे. मुंबई, नाशिकनंतर नगरमधील तारांगण राज्यात तिसरे, तर देशात 21 वे ठरणार आहे. या तारांगणाचे उद्घाटन रविवारी (14 जुलै) होणार आहे.

एफर्ट्स अकॅडमीचे संचालक प्रा. अशोक जोगदे यांनी गुरुवारी पत्रकारांना हे तारांगण दाखवून त्याची माहिती दिली. ते म्हणाले, विज्ञानाचा शिक्षक असल्याने मुंबईच्या नेहरू तारांगणास अनेकदा भेट दिली होती. मोठय़ा शहरात असे तारांगण असल्याने नगरचे फार कमी लोक त्याला भेट देऊ शकतात. असे तारांगण नगरमध्ये उभारण्याचे स्वप्न होते. सन 2000 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर तारांगणासह सायन्स पार्क उभारण्याचे ठरवले. ते स्वप्न आता साकारले आहे.

तारांगणासाठी दोन कोटी खर्च आला आहे. अतिशय देखण्या वास्तूच्या दुसर्‍या मजल्यावर तारांगणासाठी अत्याधुनिक थिएटर उभारण्यात आले आहे. वरच्या भागात अर्धवतरुळाकार डोममध्ये प्रोजेक्टर व अत्याधुनिक ध्वनियंत्रणेद्वारे विद्यार्थ्यांना अवकाशशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांवरील शो पाहण्यास मिळतील.

या तारांगणातील डिजिस्टार-4 ही यंत्रणा अत्याधुनिक आहे. फक्त डोमसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील सवरेत्तम फिल्म येथे पाहता येतील. दर 15 दिवसांनी नवीन शो व अत्याधुनिक यंत्रणेमुळे मुलांना खरोखरच त्या विश्वात सैर करण्याचा आनंद मिळणार आहे.

तारांगणातील शो
बर्फाचे जग, मंगळावरील शोधमोहीम, जगातील सात आश्चर्ये, सूर्याची गुपिते, मोठय़ा योजनेचे लघुरूप (वैद्यकीय क्रांती), अवकाशातील आश्चर्ये, नवी क्षितिजे, अंतरिक्षातील प्रवास या शिवाय अभ्यासक्रमावर आधारित शोही येथे दाखवण्यात येतील.

विज्ञान शिक्षणाला मिळणार चालना
या प्रकल्पामुळे अमेरिकेत व जगात विज्ञानावरचे जे शो दाखवले जातात, ते येथे बघायला मिळतील. तारांगणाबरोबरच सायन्स पार्क, सायन्स म्युझियम व सायन्स एक्झिबिशनमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञान शिक्षणाला चालना मिळेल. एफर्ट्स अकॅडमीने स्वत:चे काही सायन्स प्रोजेक्ट वर्कशॉप तयार केले आहेत. त्यामुळे जगातील अत्याधुनिक असे विज्ञानाचे दालन नगरसह मराठवाडा व विदर्भातील मुलांना खुले होणार आहे. शैक्षणिक सहलीतील मुला-मुलींसाठी राहण्याचीही व्यवस्था येथे असेल, असे प्रा. जोगदे यांनी नमूद केले.