आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विज्ञान: नगरमध्ये एफर्ट्स अकॅडमीने साकारले डिजिटल तारांगण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरपासून 11 किलोमीटर अंतरावरील धनगरवाडी येथे डिजिटल तारांगण (प्लॅनेटोरियम) उभारण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एफर्ट्स अकॅडमीने त्याची उभारणी केली आहे. मुंबई, नाशिकनंतर नगरमधील तारांगण राज्यात तिसरे, तर देशात 21 वे ठरणार आहे. या तारांगणाचे उद्घाटन रविवारी होणार आहे.


एफर्ट्स अकॅडमीचे संचालक प्रा. अशोक जोगदे यांनी गुरुवारी पत्रकारांना हे तारांगण दाखवून त्याची माहिती दिली. ते म्हणाले, विज्ञानाचा शिक्षक असल्याने मुंबईच्या नेहरू तारांगणास अनेकदा भेट दिली होती. मोठ्या शहरात असे तारांगण असल्याने नगरचे फार कमी लोक त्याला भेट देऊ शकतात. असे तारांगण नगरमध्ये उभारण्याचे स्वप्न होते. सन 2000 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर तारांगणासह सायन्स पार्क उभारण्याचे ठरवले. ते स्वप्न आता साकारले आहे.
तारांगणासाठी दोन कोटी खर्च आला आहे. अतिशय देखण्या वास्तूच्या दुस-या मजल्यावर तारांगणासाठी अत्याधुनिक थिएटर उभारण्यात आले आहे. वरच्या भागात अर्धवर्तुळाकार डोममध्ये प्रोजेक्टर व अत्याधुनिक ध्वनियंत्रणेद्वारे विद्यार्थ्यांना अवकाशशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांवरील शो पाहण्यास मिळतील. या तारांगणातील डिजिस्टार-4 ही यंत्रणा अत्याधुनिक आहे. फक्त डोमसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील सर्वोत्तम फिल्म येथे पाहता येतील. दर 15 दिवसांनी नवीन शो व अत्याधुनिक यंत्रणेमुळे मुलांना याचा आनंद मिळणार आहे.


तारांगणातील शो
बर्फाचे जग, मंगळावरील शोधमोहीम, सात आश्चर्ये, सूर्याची गुपिते, मोठ्या योजनेचे लघुरूप (वैद्यकीय क्रांती), अवकाशातील आश्चर्ये, नवी क्षितिजे, अंतरिक्षातील प्रवास या शिवाय अभ्यासक्रमावर आधारित शोही येथे दाखवण्यात येतील.