आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील दुष्काळी गावांत साकारले डिजिटल स्कूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खासगी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषदांच्या शाळा मागे पडल्याचा कांगावा वारंवार केला जातो. पण ही परिस्थिती बदलली असल्याचे वडगाव आमली येथील जिल्हा परिषदेची शाळेने दाखवून दिले. पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावकरी वर्षानुवर्षे टँकरच्या पाण्यावरच तहान भागवतात. पण 'आपला गाव आपली शाळा' अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजली आहे. याच भावनेतून लोकवर्गणी करून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यात आली.
जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घसरत असताना खासगी शाळांचे पेव फुटले आहे. जाहिरातबाजी आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देऊन काही खासगी शाळांकडून पालकांची लूट सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ऊर्जितावस्था देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रगत करण्याबरोबच सेमी इंग्रजी वर्गही सुरू करण्यात आले. ई-लर्निंगच्या माध्यमातून शाळांमध्ये अद्ययावत पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा लोकसहभागातूनच संगणकीकृत झाल्या आहेत. त्यातच पारनेर तालुक्यातील वडगाव आमली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली.

वडगाव आमली हे गाव दुष्काळी असून पिण्यायोग्य पाणीदेखील उपलब्ध नाही. खाऱ्या पाण्यामुळे गावकऱ्यांना वर्षानुवर्षे टँकरचे पाणी प्यावे लागते. पण जागृत ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव आदर्श बनले. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी लोकवर्गणी करून ही शाळा डिजिटल केली.

शाळेचे उद‌्घाटन नवाल यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी सरपंच अलका जाधव, गटविकास अधिकारी किशोर काळे, गटशिक्षणाधिकारी के. एल. पटारे, केंद्रप्रमुख एस. बी. कदम, सुनील जाजगे, प्रकाश नांगरे, मारुती डेरे, गुलाब ढोणे आदी उपस्थित होते.

शाळेत एक डिजिटल वर्ग असून ५० इंची एलईडी टीव्ही बसवण्यात येणार आहे. त्याबरोबरच लर्निंगसाठी दोन संगणकसंचही उपलब्ध करण्यात आले आहे. शाळेच्या वतीने वर्षभर विविध शालेय उपक्रम राबवले जात असल्याने ग्रामस्थांकडून शाळेला आवश्यक सहकार्य केले जाते. शाळा केवळ जिल्हा परिषदेची नव्हे तर गावकऱ्यांची आहे, अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. लोकवर्गणीतून साकारलेली डिजिटल शाळा जिल्ह्यासाठी आदर्श बनल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

गाव स्वच्छ आदर्श
निर्मलग्राम पुरस्कार गावाला २००३-२००४ मध्ये मिळाले आहे. गाव स्वच्छ आदर्श आहे. वर्षभर शाळेत उपक्रम राबवले जातात, सहल, प्रदर्शनांचेही आयोजन केले जाते. शाळेचा पट घसरत नाही वाढतो. विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांनी इन्व्हर्टर देण्याचे मान्य केले. सुनील जाजगे, शिक्षक.

शिक्षणासाठी काहीही
शाळाडिजिटल झाली, पण गावात तीन तास भारनियमन असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा येणार. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ग्रामस्थांनी इन्व्हर्टर देण्याचीही तयारी दाखवली. भारनियमनावर मात करून डिजिटल स्कूल संकल्पना यशस्वीपणे राबवण्याचा पहिलाच उपक्रम असेल.

वडगाव आमली येथे आयोजित कार्यक्रमात स्वागत गीताएेवजी इंग्रजी कवितेचे सादरीकरण करताना विद्यार्थी-विद्यार्थिनी. दुसऱ्या छायाचित्रात डिजिटल वर्गाचे उद‌्घाटन करताना सरपंच अलका जाधव.

८० हजारांचा निधी
आपल्यापाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सुमारे ८० हजारांचा निधी उपलब्ध केला. या निधीतून शाळेला रंगकाम पूर्ण झाले. एका वर्गात एलईडी टीव्ही तसेच दोन संगणक संच शिक्षणासाठी ठेवण्यात आले आहेत.

इंग्रजी नाटिका
शाळांमधीलकार्यक्रमाचा प्रारंभ नेहमी स्वागत गीताने केला जातो, पण वडगाव आमली येथे पाहुण्यांचे स्वागत गीताऐवजी इंग्रजी कविता, नाटिका भाषणे करून विद्यार्थ्यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांची तयारी पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनीही विशेष कौतुक केले.

पाण्यासाठी लाख
वडगावआमली या गावाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावात तीन लाखांची वॉटर प्युरिफायर बसवण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी तयारी दाखवली. प्रस्ताव आल्यानंतर लाख ३० हजार जिल्हा परिषद, तर ७० हजार लोकवर्गणी दिल्यास गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.