नगर - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून अवघ्या सात दिवसांवर मतदान आले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांनी परस्परांवर वैयक्तिक टीका आतापर्यंत तरी टाळली आहे. दोन्ही पक्षांचे इतर नेते वैयक्तिक तोंडसुख घेण्यात मग्न असताना या प्रमुख उमेदवारांनी दाखवलेल्या संयमाचे मतदारांकडून कौतूक होत आहे.
नगर मतदारसंघासाठी 17 एप्रिलला मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. हातघाईवर आलेल्या प्रचारात परस्परांची उणीदुणी काढून प्रतिमा मलिन करण्याचा फंडा उमेदवारांकडून वापरला जातो. उमेदवारी जाहीर झाल्यापासून राजळे व गांधी यांनी मात्र परस्परांवर वैयक्तिक टीकाटिपण्णी करण्याचे टाळले आहे. गेल्या महिनाभरात प्रचारसभांमध्ये भाषण करताना त्यांनी हे पथ्य सांभाळले आहे. टीका करून वैयक्तिक दोष दाखवण्याऐवजी या प्रमुख उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या कामाची व निवडून आल्यानंतरच्या कामाचा प्राधान्यक्रम मतदारांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारमध्ये गाजलेल्या घोटाळ्यांची उजळणी करण्याचेही खासदार गांधी विसरले आहेत. राजळे यांच्यावर होत असलेले पाथर्डी दूध संघातील गैरव्यवहारांच्या आरोपांचा पुनरूच्चार करण्याचेही गांधींनी जाणीवपूर्वक टाळले आहे.
राजळे यांनी नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारांचा मुद्दाच प्रचारात येऊ दिलेला नाही. दोन्ही उमेदवारांनी एका शब्दानेही परस्परांवर वैयक्तिक टीका आतापर्यंत केलेली नाही. शेवटच्या टप्प्यातील त्यांच्या भूमिकेकडे मतदारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे राज्यस्तरीय व स्थानिक नेते दोन्ही उमेदवारांवर टीकेच्या तोफा डागत वैयक्तिक आरोप करत आहेत. राजळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारांवरून गांधी यांच्यावर थेट टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराची दिशा स्पष्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही या आरोपांची उजळणी केली. जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी तर प्रत्येक सभेत या आरोपांचा रतीबच घातला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वैयक्तिक टीका करण्याची संधी सोडली नाही. गांधी यांना लक्ष्य करत अर्बन बँकेतील गैरव्यवहार त्यांनी भाषणातून उगाळला. गांधी यांनी मतदारसंघात न केलेल्या कामाची उजळणी या नेत्यांकडून होणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादीचा प्रचार केवळ अर्बन बँकेचा गैरव्यवहार केंद्रस्थानी ठेवून सुरू आहे.
गांधी यांनी स्वत:हून पुढे येत या आरोपांचे खंडण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मोदी यांच्या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेचा अपवाद वगळता त्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले नाही. केंद्र व राज्य सरकारमध्ये गेल्या तीन-साडेतीन वर्षांत मोठमोठे घोटाळे गाजले. आदर्श, टुजी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल स्पर्धा, कोलगेट अशा विविध घोटाळ्यांनी देशभर खळबळ उडवून दिली. या मुद्यांचा वापरही गांधी यांच्याकडून होताना दिसत नाही.
दुसरीकडे हाच मुद्दा आमदार राम शिंदे यांनी आपल्या प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनीही राजळे यांच्यावर वैयक्तिक टीकेची एकही संधी सोडलेली नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीतील हिशेब चुकते करण्यासाठी त्यांनी राजळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांची घणाघाती भाषणे हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
शिर्डीत विखारी प्रचार
शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर वैयक्तिक टीकेची झोड उठली आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. वाकचौरे यांनीही लोखंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पक्षाचे उमेदवार नितीन उदमले यांनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत वैयक्तिक टीकेला थोडे दूरच ठेवले आहे.
दीपाली सय्यद शांतच
नगर मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर वैयक्तिक टीका आतापर्यंत तरी टाळली आहे. मतदारांच्या गाठीभेटींवरच त्यांचा भर आहे. तिसर्या आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे वैयक्तिक चिखलफेकीपासून दूर होते. मात्र, गुरुवारी त्यांनी अर्बन बँकेच्या गैरव्यवहारावरून गांधी यांच्यावर तोफ डागली. राजळे यांच्यावरही आरोपांची तयारी त्यांनी सुरू केली आहे.