आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्टिस्टेट दर्जावर चौकशीचा कोणताही परिणाम नाही : गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर अर्बन बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळवताना कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. हा दर्जा रद्द करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून कोणत्याही चौकशीचा बँकेच्या मल्टिस्टेट दर्जावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी विरोधकांवर टीका केली.

मल्टिस्टेट दर्जा मिळाल्यानंतरही अर्बन बँकेच्या पाठीमागे चौकशीचे शुक्लकाष्ट सुरू आहे. विरोधकांच्या तक्रारीमुळे नव्याने चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्याने गांधी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषपूर्तीचे पालन व बँकेचा कार्यक्षम कारभार लक्षात घेऊन केंद्रीय निबंधकांनी बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा दिला आहे. पोटशूळ उठलेल्या विरोधकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काहींनी थेट दिल्लीला धाव घेत केंद्रीय निबंधकांकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीचा बँकेच्या मल्टिस्टेट नोंदणीवर कोणताही परिणाम होणार नाही. माजी अध्यक्ष व दीर्घकाळ संचालक असलेल्या एका विधिज्ञाने बँकेच्या मल्टिस्टेट दर्जाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका 14 जून रोजी दाखल केली आहे. बँकेच्या प्रगतीत शून्य टक्के योगदान असलेले विरोधक प्रत्येक बाबीत दिशाभूल करण्याचा प्रय} करत आहेत. राजकीय हेतूने बँकेच्या प्रगतीला खीळ घालण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न निष्फळ ठरणार असून सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे गांधी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

धमक्यांऐवजी कारवाई करा
बदनामी ही सभासदांचे हित पाहिल्याने होत नाही, तर ती गैरव्यवहारामुळे होत आहे. गैरव्यवहार करणे हीच जर आचारसंहिता असेल, तर ही आचारसंहिता आम्ही तोडली आहे. नुसत्या पोकळ धमक्या देण्यापेक्षा अध्यक्ष गांधी यांनी कारवाई करूनच दाखवावी. मल्टिस्टेट करताना चुकीची पद्धत अवलंबण्यात आली. यासंदर्भात केंद्रीय निबंधकांकडे तक्रारी केल्या. त्यांना यात तथ्य आढळले. त्यानंतरच चौकशीचे आदेश निघाले आहेत. बिनबुडाचे आरोप करून गांधी या अधिकार्‍यांवरच अविश्वास व्यक्त करत आहेत.’’ राजेंद्र गांधी, संचालक.