आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Gandhi Inauguration Road Issue At Nagar, Divya Marathi

कामाची मुदत संपताना गांधींनी केले ‘भूमिपूजन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काम पूर्ण करण्याची निर्धारित मुदत संपत आली असताना अपूर्ण राहिलेल्या केडगाव-हिवरेबाजार रस्त्याचे चक्क ‘भूमिपूजन’ करून श्रेय लाटण्याचा प्रकार खासदार दिलीप गांधी यांनी केला. आचारसंहिता कालावधीत विकासकामांचे फलक झाकले जातात, तथापि, या भूमिपूजनाचा फलक झाकण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. लोकसभा
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या केवळ तीन दिवस अगोदर या कामाचे भूमिपूजन झाले हे विशेष!
तत्कालीन केंद्रीय ग्रामविकासमंत्री रघुवंश प्रतापसिंग यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हिवरेबाजारकडे जाणारा हा रस्ता मंजूर केला. नंतर या पदावर आलेले जयराम रमेश यांनी 10 मार्च 2012 रोजी हिवरेबाजारला दिलेल्या भेटीत केडगाव-नेप्ती-हिवरेबाजार-दैठणेगुंजाळ हा 17.36 किलोमीटरचा सुधारित प्रस्ताव मंजूर केला. 8 कोटी 15 लाखांच्या या कामास एस. एस. कन्स्ट्रक्शनने 18 मार्च 2013 रोजी सुरुवात केली. प्लास्टिकचा वापर करण्यात येणार असल्याने हा देशाच्या ग्रामीण भागातील सर्वात आधुनिक रस्ता होणार होता. वर्षभरात म्हणजे 17 मार्च 2014 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. दैठणे गुंजाळ ते नेप्ती शिवारातील वैभव पशुखाद्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तथापि, काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर साइडपट्टया नसल्यामुळे रस्ता फुटत असल्याची तक्रार आहे.
नेप्ती ते केडगाव या दीड किलोमीटर रस्त्याच्या कामाला अजून सुरूवातच झालेली नाही. हे 20 टक्के काम पूर्ण करण्यास दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यासाठी कामाला मुदतवाढ घेणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही.
काम पूर्ण करण्याची मुदत संपण्यास काही दिवसच उरलेले असताना या रस्त्याचे ‘भूमिपूजन’ खासदार गांधी यांनी केले. तसा फलक केडगाव येथे लावण्यात आला असून आमदार विजय औटी व शिवाजी कर्डिले या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे. निवडणुकीची आचारसंहिता 5 मार्चपासून लागू झाली आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधी 2 मार्चला भूमिपूजन उरकण्यात आले. हिवरेबाजारचे राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले नाव हा रस्ता मंजूर होण्यास व कामाची व्याप्ती वाढण्यास महत्त्वाचे कारण ठरले. किमान मुदतीत काम पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची अपेक्षा गांधी यांच्याकडून असताना कामाचा पाठपुरावा करण्याऐवजी ‘भूमिपूजन’ करण्याचा पराक्रम त्यांनी केला.
या भूमिपूजनानंतर सात दिवसांनी 10 मार्चला हिवरेबाजारसह दैठणे गुंजाळ, पिंपळगाव वाघा, निमगाव वाघा व नेप्तीच्या सरपंचांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. कामाचा निधी परत जाण्याची भीती व्यक्त करून रास्ता-रोकोचा इशाराही त्यांनी दिला होता.
अद्याप मुदतवाढ नाही
रस्त्याच्या कामाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. येत्या चार-पाच दिवसांत ठोस माहिती मिळू शकेल.’’ एच. आर. रणधीर, कनिष्ठ अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना.
मला माहिती नाही..
आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नेप्तीच्या बाजूने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबाबत मला काहीही माहिती नाही. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया नको.’’ पोपटराव पवार, अध्यक्ष, आदर्श गाव समिती.
गांधींकडून प्रतिसाद नाही
प्रतिक्रिया घेण्यासाठी खासदार दिलीप गांधी यांच्याशी शुक्रवारी दुपारी व सायंकाळी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रतिक्रिया समजली नाही.