आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Gandhi News In Marathi, BJP, MP,Nagar Lok Sabha Constituncy, Divya Marathi

खासदार गांधी यांचा शहरातील प्रचार थंडच, कार्यकर्त्यांचा वानवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मारून मुटकून का होईना, पण शिवसेनेचे काही नगरसेवक महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारात उतरले आहेत, परंतु भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर, शहर सरचिटणीस अनंत जोशी, तसेच काही नगरसेवक मागील तीन-चार दिवसांपासून प्रचारात तटस्थ आहेत. उन्हामुळे आगरकर आजारी पडले आहेत. ऊन्हं कमी झाल्यानंतरच ते प्रचारात सक्रिय होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. गांधी यांच्या शहरातील प्रचारफेर्‍यांत कार्यकर्त्यांचीही मोठी वानवा असल्याने महायुतीच्या प्रचाराला अजून गती मिळालेली नाही.
नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या गांधी यांनी सध्या ग्रामीण भागातील प्रचारावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे शहरातील प्रचाराकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील प्रचाराची जबाबदारी आगरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुरुवातीला आगरकर यांनी मोठय़ा उत्साहात प्रचार केला. परंतु आठवडाभरानंतर ते ‘आजारी’ पडले. त्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून ते प्रचारात दिसेनासे झाले आहेत.
प्रचारासाठी केवळ आठवडा शिल्लक असताना शहरात महायुतीच्या प्रचाराला अजून गती मिळालेली नाही. शिवसेनेची मनधरणी करण्यात गांधी यांचा वेळ खर्च झाला. महापालिका निवडणुकीत झालेल्या चुका विसरून प्रचारात सक्रिय व्हावे, यासाठी गांधी यांनी आमदार अनिल राठोड यांना साकडे घातले. राठोड महायुतीचा धर्म पाळत गांधी यांच्या प्रचारसभांना हजेरी लावत आहेत. गांधी यांचा प्रचार करावा, असा आदेशही त्यांनी शिवसेना नगरसेवकांना दिला, परंतु काही नगरसेवकांना प्रचाराचे मुद्देच माहिती नव्हते, तर काहींनी गांधी यांचे निमंत्रण आल्यावर विचार करू, अशी भूमिका घेतली. गांधी यांनी मागील आठवड्यात राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली. झाले गेले विसरून काम करा, असे भावनिक त्यांनी केले. त्यानंतर काही शिवसेना नगरसेवक गांधी यांच्या प्रचारफेरीत सहभागी झाले, परंतु भाजपचेच काही पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते प्रचारापासून तटस्थ आहेत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही प्रभागांमध्ये गांधी यांची प्रचारफेरी काढण्यात आली, परंतु त्याकडे शिवसेना-भाजपच्या काही नगरसेवकांनी पाठ फिरवली. भाजपच्या नगरसेविका मालन ढोणे यांच्या प्रभागात सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या फेरीत बोटावर मोजण्याएवढेच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोणतेही नियोजन नसल्याने शिवसेना नगरसेवकांनीही फोटोसेशन झाल्यानंतर प्रचारफेरीतून काढता पाय घेतला.
नाराज कार्यकर्ते खासदार गांधी यांच्यापासून दुरावले
महापालिका निवडणुकीत भाजपच्या पंचकमिटीने अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले. त्यात भय्या गंधे यांचाही समावेश आहे. नगरसेवकपदाची उमेदवारी ऐनवेळी नाकारल्याने नाराज झालेल्या गंधे यांनी गांधी यांच्यापासून फारकत घेतली आहे. शहरात गांधी यांचा प्रचार करण्याऐवजी गंधे यांनी शिर्डी मतदारसंघ गाठून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार सुरू केला. गंधे यांच्याप्रमाणेच आणखी काही कार्यकर्ते गांधी यांच्यापासून दुरावले आहेत.
गांधी यांच्या शहरातील प्रचारफेरीत शिवसेना व भाजपचे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
आपलं कोण?
महापालिका निवडणुकीपासून भाजपच्या शहर कार्यकारिणीत शीतयुध्द सुरू आहे. गांधी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकार्‍यांना आपलं कोण, हेच कळेनासे झाले आहे. त्यातूनच आठ दिवसांपूर्वी दोन पदाधिकार्‍यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मनपा निवडणुकीत हरण्यासाठी 12 लाख रुपये घेतले, असा आरोप एकाने दुसर्‍यावर केला. नंतर हे प्रकरण मिटले, तरी या शीतयुध्दाचा परिणाम गांधी यांच्या प्रचारावर होत आहे.