आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Gandhi Start Publicity Issue At Nagar, Divya Marathi

लालकृष्ण अडवाणींच्या हस्ते उद्या गांधींच्या प्रचाराला प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते नारळ वाढवून शेवगाव येथे सोमवारी (31 मार्च) दुपारी तीन वाजता नगर मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारास प्रारंभ होणार आहे. त्या वेळी महायुतीचे या मतदारसंघातील चारही आमदार, तसेच जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेवगावातील खंडोबाचा माळ येथील मैदानावर दुपारी तीन वाजता अडवाणी यांची सभा होईल. 1999 व 2009 मध्ये गांधी यांच्या प्रचारासाठी अडवाणींची शेवगाव येथे सभा झाली होती. प्रताप ढाकणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शेवगाव-पाथर्डीत भाजपची अवस्था निर्नायकी झाली आहे. याच परिसरात पाडव्याच्या मुहूर्तावर होणारी अडवाणींची सभा
पक्षाला संजीवनी देण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्याही सभा होणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली. ते म्हणाले, रामदास आठवले यांच्याही तीन ते चार सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही दोन्ही मतदारसंघांच्या सीमेवरील कोल्हारमध्ये सभा घेण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ते शक्य न झाल्यास त्यांची नगरमध्ये स्वतंत्र सभा घेण्यासाठी प्रयत्न करू. पाच तारखेला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या उपस्थितीत नगरमध्ये ‘पदवीधरांचे समाजजीवनात योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे गांधी यांनी सांगितले. या वेळी विरोधक अर्बन बँकेतील गैरव्यवहाराबाबत बोलत असल्याबाबत विचारले असता गांधी म्हणाले, विरोधकांकडे मुद्दा नाही. त्यात वरिष्ठांना चुकीची माहिती देत असल्याने ते अर्बनवर टीका करत आहेत. याबद्दल बँकेचे वरिष्ठ नेते सुवालाल गुंदेचा यांनी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या राजकारणात बँकेला का ओढता, असा सवाल करणारे पत्रही लिहिल्याचे गांधी यांनी सांगिले.

खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीकडे लक्ष
गेल्या वेळेच्या सभेला वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे या सभेकडे फिरकले नव्हते. त्या वेळी मुंडे यांच्या अनुपस्थितीची चर्चाच अधिक झाली होती. या वेळीही मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते या सभेला उपस्थिती लावतात का? याकडे भाजप पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शेवगाव-पाथर्डीतून भाजपचे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्याकडे बघितले जात आहे. त्याबाबतीतही काही संकेत अडवाणी यांच्या सभेतून मिळतात का, याचीही उत्सुकता आहे.