आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वळसे गुरुजींनी घेतला शिक्षणसम्राटांचा वर्ग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘‘तुम्ही माझ्या वर्गात बसलेले आहात आणि मी ‘शिस्तप्रिय गुरुजी’ आहे. मला माझ्या वर्गात अजिबात बडबड चालत नाही. (विद्यार्थ्याकडे बोट दाखवत) तू.. हो.. तूच.. इथे गोंधळ घालायला हे काय ‘विधानभवन’ नाही, ही शाळा आहे. माझ्या वर्गात शांतता राखली पाहिजे,’’ अशा मिश्किल शब्दांमध्ये विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांनी रविवारी सकाळी विद्यार्थ्यांची, तसेच जिल्ह्यातील शिक्षणसम्राटांचा वर्ग घेतला.

निमित्त होते नागापूर येथील ग्रामीण विकास मंडळ संचलित सनफार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचे. कार्यक्रमाला उपस्थित असेलल्या जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या पदाधिकारी व संस्थाचालकांना त्यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. वळसे म्हणाले, केवळ शंभर टक्के निकाल लागला म्हणजे शाळा परिपूर्ण ठरत नाही. शाळेबाहेर पडल्यावर स्पर्धेमध्ये ज्या शाळांची मुले टिकतात, त्यावरच शाळेचे यश ठरते. आपण महासत्ता होऊ तेव्हा भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असेल. पण त्यावेळच्या तरुणाईला आपण कोणते शिक्षण देणार आहोत, याचा आतापासूनच विचार करायला हवा. त्यामुळे केवळ शाळा-महाविद्यालये सुरु करण्यापेक्षा शैक्षणिक दर्जा आणि शिक्षणपद्धतीचे निकष ठरवण्याची वेळ आता आली आहे.

निव्वळ भव्य-दिव्य इमारत व चकचकीत खोल्या म्हणजे चांगली शाळा नव्हे. त्याऐवजी शिक्षकांच्या नावाने व शिकवण्याच्या पद्धतीने शाळा ओळखली गेली पाहिजे. सध्याच्या शैक्षणिक आकडेवारीवर नजर टाकली, तर शंभरपैकी फक्त 17 विद्यार्थी पदवीपर्यंत जातात. इतर 80 विद्यार्थी कुठे जातात, हा संशोधनाचा विषय आहे. दुर्दैवाने जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत केवळ पगार, वाढीव भत्ते, शासनादेश, शिक्षकांच्या बदल्या अन् स्वच्छतागृहे याभोवतीच शिक्षणाची चर्चा व राजकारण रंगते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एकलव्य द्रोणाचार्यांच्या पुतळ्याकडून धनुर्विद्या शिकला. तुम्ही संगणक व मोबाइलला द्रोणाचार्य माना. एकवेळ पालकांनी मुलीच्या लग्नात जेवणावळी नाही दिल्या तरी चालतील, पण शिक्षणासाठी तिला संगणक घेऊन द्या, असे आवाहन वळसे यांनी केले.

यावेळी पालकमंत्री मधुकर पिचड, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, आमदार अरुण जगताप, चंद्रशेखर घुले व शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे, सदस्य सुजित झावरे, राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष अरुण कडू, परिक्रमा शिक्षण संस्थेचे विक्रम पाचपुते, राष्ट्रवादी महिलाध्यक्ष रार्जशी मांढरे, अँड. शारदा लगड, रावसाहेब म्हस्के, बाळासाहेब जगताप, हमाल पंचायतचे अध्यक्ष शंकरराव घुले, डॉ. रावसाहेब अनभुले, शब्बीर देशमुख, सनफार्मा कंपनीचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

धडे - विद्यार्थ्यांना व पालकांना..
पालकांनो, विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेतल्याशिवाय त्याला कुठेही पाठवू नका. मीदेखील ‘झेडपी’च्या शाळेत शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून शिकलो आणि मोठा झालो. तुम्हीही हे सर्व करु शकता. केवळ शेजारचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो म्हणून इंग्रजीचा आग्रह धरु नका. अभ्यासक्रम, गुण आणि टक्केवारीच्या चक्रव्युहामध्ये तर अजिबात अडकू नका. यशस्वी व्हायचे असेल, तर ज्ञानार्जन करा, असे आवाहन वळसे यांनी विद्यार्थी व पालकांना केले.

धडे - शिक्षणसम्राटांना..
शैक्षणिक क्रांती घडवायची असेल, तर पदवीचा टप्पा गाठेपर्यंत गळालेल्या नापास विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करा. तसे केले तरच विद्यार्थी स्वावलंबी होतील. आपापल्या संस्थांमधील शिक्षकांचे मूल्यमापन करुन त्यांना नवीन गोष्टी शिकवा, या प्रक्रियेत पालकांनाही समाविष्ट करा, असे आवाहन वळसे यांनी संस्थांचालकांना केले. तुमच्या संस्थांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये पदवीऐवजी ज्ञानदानाला महत्व द्या, असेही ते म्हणाले.

धडे - दादा कळमकरांना..
निव्वळ शाळा-महाविद्यालयांची संख्या वाढवण्याऐवजी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करा. दादाभाऊ, तुमच्या संस्थेचे विद्यार्थी भविष्यात कुठे गेले, किती डॉक्टर झाले, किती इंजिनिअर झाले याचे ‘रेकॉर्ड’ ठेवा. जेणेकरुन आपण कोठे कमी पडतो, हे लक्षात येईल. ग्रामीण विकास संस्थेला 10 लाख रुपयांचा निधी देत असल्याचे वळसे यांनी जाहीर केले. पण हा निधी इमारत बांधायला नव्हे, तर संगणक व वैज्ञानिक साहित्य घेण्यासाठीच वापरा, असे त्यांनी बजावले.