आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipak Kamble Article About Nagar Election, Divya Marathi

निवडणूक प्रचारात येईना रंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे पंधरा दिवस उरले असतानाही प्रचारात अद्याप रंगत आलेली नाही. सुरुवातीला झालेली गारपीट व त्यानंतर वाढलेल्या उन्हाच्या झळांचा फटका प्रचाराला बसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारातील रंगत उडाल्याचे चित्र आहे.

निवडणुका जाहीर होऊन 25 दिवसांचा कालावधी होत आला आहे, तर जाहीर प्रचाराची मुदत संपण्यास सतरा दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र, जिल्ह्यातील नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांच्या प्रचारात रंगत आलेली नाही. निवडणुका जाहीर होण्याच्या आसपास राज्यात झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाने सुरुवातीचा प्रचार गारठला. सत्ताधार्‍यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांसाठी केलेल्या कामाचा, तर सरकार गारपीटग्रस्तांना मदत करत नसल्याचा पाढा विरोधकांकडून वाचला गेला. गारपिटीनंतर आता वाढत्या उन्हाच्या झळांनी प्रचारात आडकाठी आणली आहे. तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या आसपास असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. नगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार दिलीप गांधी व काँग्रेस आघाडीचे राजीव राजळे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मात्र, ही लढत आम आदमी पक्षाच्या सोफिया (दीपाली) सय्यद व अपक्ष म्हणून रिंगणात असलेले माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांच्यामुळे चौरंगी झाली आहे. सय्यद व कोळसे यांच्याकडे स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभारून प्रचार करण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन वेळा दौरा करत चार प्रचारसभा घेतल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे वगळता मोठय़ा सभा झालेल्या नाहीत. राजळे व गांधी अजूनही स्वपक्ष व मित्रपक्षातील नाराजांची समजूत काढण्यातच व्यग्र आहेत.

शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंना प्रचारासाठी फिरणेच मुश्कील झाले आहे. शिवसैनिकांची नाराजी त्यांना भोवत आहे. विखे यांचेच उमेदवार असल्याचा शिक्का बसत असल्याने काँग्रसमधील विखे विरोधक व राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेण्याच्या आव्हानाचा त्यांना सामना करावा लागत आहे. शिवसेनेकडून उशिराने उमेदवारी निश्चित झालेले सदाशिव लोखंडे यांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराची रंगत शेवटच्या टप्प्यात वाढणार का? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

उन्हाचा पारा चाळिशीजवळ..
निवडणुकीच्या रणधुमाळीसोबत तापमानाचा पारा वाढत आहे. सध्या कमाल तापमान 40 अंश सेल्सियसदरम्यान आहे. एप्रिल महिन्यात त्यात आणखी भर पडणार आहे. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती कायम राहत आहे. त्यामुळे प्रचारातील अडचणीत आणखी भर पडत आहे.

मतदारसंघांचा विस्तार मोठा
नगर मतदारसंघात नगर, पारनेर, श्रीगोंदे, जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, राहुरी तालुक्यातील गावांचा समावेश होतो. सुमारे दीडशे किमीच्या परिघातील मतदारसंघ पिंजून काढणे उमेदवारांसाठी अशक्यप्राय ठरते. महत्त्वाच्या गावांना धावती भेट, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचे सहकार्य व बड्या नेत्यांच्या सभांवर प्रचाराचा भर राहणार आहे.