आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन चाकी सायकल वाटपात मोठा घोटाळा, सर्व साहित्य वाटपाच्या चौकशीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत २०१३-२०१४ मध्ये तीन टक्के सेस फंडातून करण्यात आलेल्या तीनचाकी सायकल वाटपात मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. संगमनेर येथील एका अशिक्षित महिलेने तीनचाकीसाठी प्रस्ताव सादर केला होता. या महिलेला पात्रही ठरवण्यात आले. संबंधित महिलेला स्वाक्षरी करता येत नाही. पण पंचायत समितीच्या साहित्य वाटप नोंदवहीत त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी करून साहित्य वाटप झाल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात या महिलेला लाभ मिळालाच नाही. लाभ दुसऱ्याच कुणाला तरी दिल्याचे उघड झाले.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकूण उत्पन्नाच्या तीन टक्के निधी अपंगांच्या पुनर्वसनाच्या योजनेसाठी राखून ठेवून वैयक्तिक लाभांच्या योजनांवर खर्च केला जातो. अपंगांना तीनचाकी सायकल वाटण्याच्या योजनेसाठी सुमारे २० लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु या योजनेसाठी अर्ज येण्याचे प्रमाण कमी आहे. तथापि, या सायकलीसाठी सुमारे सात लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याचे अपंग कल्याण विभागाचे म्हणणे आहे. परंतु साहित्य वाटपात घोटाळा झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संगमनेर तालुक्यातील बोटा येथील सोनाबाई माणिक रोकडे यांनी २०१३-२०१४ या वर्षात जिल्हा परिषद सेस फंडातून अपंगाची तीनचाकी सायकल मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी छाननी करून त्यांचा प्रस्ताव मंजूर केला. मंजूर लाभार्थी यादीत रोकडे यांचे नाव होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी पात्र लाभार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्याचे पत्र मार्च २०१४ रोजी दिले. साहित्य वाटताना संबंधित लाभार्थ्यांची नोंद वहीत स्वाक्षरी घेतली जाते.

रोकडे यांनी पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करून सायकल मिळण्यासाठी विनंती केली. परंतु त्यांना सायकल देण्यास टाळाटाळ करण्यात आली. रोकडे या अंगठेबहाद्दर असल्याने त्यांनी प्रस्तावावर अंगठ्याचा ठसा दिला. पण सायकलीचा लाभ मिळाल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेने अपंग महिलेवर अन्याय झाल्याप्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागवली. त्यात रोकडे यांच्या नावे सायकल वाटप झाल्याचे आढळून आले. गटविकास अधिकाऱ्यांच्या नोंदवहीमध्ये कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने रोकडे यांची खोटी स्वाक्षरी केल्याचे निदर्शनास आले.

प्रत्यक्षात लाभ मिळालाच नसल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना आक्रमक असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. रोकडे यांच्याप्रमाणेच आणखी किती लाभार्थ्यांची अशी फसवणूक करून घोटाळा झाला याचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्हा परिषद प्रशासन याप्रकरणी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, सविस्तर माहिती
बातम्या आणखी आहेत...