आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गायब गटार’प्रकरणी लाचलुचपतकडे तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गाडगीळ पटांगण परिसरातील म्हसाेबा मंदिर ते पावन गणपती कोपरादरम्यान पाइप गटाराचे काम झाल्याचे कागदोपत्री दाखवून बिल काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. संबंधित काम झालेच नसल्याचा अहवाल प्राप्त होऊन दीड वर्ष उलटले, तरी प्रशासनाने याप्रकरणी झोपेचे सोंग घेतले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे करण्यात आली आहे.

नालेगावातील गाडगीळ पटांगण परिसरातील म्हसोबा मंदिर ते पावन गणपती कोपरादरम्यान ६०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपगटारच्या कामासाठी मनपाने ई-निविदा काढली. मागास क्षेत्र अनुदान विकास निधी २०११-१२ मधील लाख ४९ हजार ९२६ रुपये खर्च दाखवून हे काम हाती घेण्यात आले. ए. बी. शेख या ठेकेदाराची निविदा मंजूर करून चार महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याच्या अटीवर तत्कालीन शहर अभियंत्याने नोव्हेंबर २०१३ मध्ये ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला. तत्कालीन शहर अभियंता आर. जी. सातपुते यांनी कामाच्या देयकाची टिप्पणी आयुक्तांकडे सादर करून कार्यारंभ आदेशानंतर दीडच महिन्यात म्हणजे डिसेंबर २०१३ च्या मध्यात लाख ७४ हजार रुपयांचे बिल अदा करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुख्य लेखापरीक्षकांचा अभिप्राय घेऊन तत्कालीन उपायुक्त महेश डोईफोडे यांनी हा प्रस्ताव त्याच दिवशी तत्कालीन आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे पाठवला. आयुक्तांनीही प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिल्याने लाख ७४ हजार १६ रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले.

संबंधित काम झालेच नसल्याची तक्रार जाकीर कादर शेख यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये मनपा आयुक्तांकडे केली, तसेच संबंधित काम दाखवा २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळवा, असे थेट आव्हानच त्यांनी दिले. मनपा प्रशासनाने तक्रारीवर कोणतीही कार्यवाही केल्याने शेख यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये तोफखाना पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली. पोलिसांनी मनपा आयुक्तांना पत्र देऊन संबंधित कामाच्या पाहणीसाठी सक्षम अधिकारी देण्याची मागणी केली. त्यानुसार तत्कालीन कनिष्ठ अभियंता एस. आर. निंबाळकर यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी चौकशी करून डिसेंबर २०१४ मध्ये शहर अभियंत्यांकडे अहवाल सादर केला. संबंधित ठिकाणी पाइपगटाराचे काम आढळून आले नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले. या अहवालानुसार संबंधित सर्वच अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी शेख यांनी पाठपुरावा केला. मात्र, अहवाल येऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
अधिकारी ठेकेदाराने संगनमत करून सरकारी निधी हडप केल्याचे यातून स्पष्ट होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेख यांनी लाचलुचपत विभागाकडे केली आहे.

खुलेआम नगरकरांची होत आहे लूट...
गाडगीळपटांगण परिसरात पावन हनुमान मंदिर आहे आणि औरंगाबाद रस्त्यावरील महापालिकेच्या नवीन इमारतीशेजारी पावन गणपती मंदिर आहे. ई-निविदेच्या माध्यमातून साडेतीन लाखांपेक्षा अधिकचे काम हाती घेताना किमान कामाच्या ठिकाणाचे नाव तरी बरोबर असावे, याचीही दक्षता घेण्यात आलेली नाही. यातूनच नगरकरांची किती खुलेआम लूट सुरू आहे, हेच समोर येते.
बातम्या आणखी आहेत...