आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावात डेंग्यूची साथ; आठ रुग्णांवर उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगावातील पाच गोडावून परिसरात मागील पंधरा दिवसांत डेंग्यूचे रुग्ण आढळले. यात बहुतांश बालकांचा समावेश आहे. नगर शहरातही डेंग्यूचे रुग्ण असण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त नागरिक शनिवारी (१८ जुलै) महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत.
डासांचा वाढता उपद्रव डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या आदी आजारांना आमंत्रण देणारा ठरतो. या पार्श्वभूमीवर केडगाव परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पण आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने केडगाव येथील पाच गोडावून परिसरात एकाच गल्लीतील आठजणांना डेंग्यूची लागण झाली. यातील निकिता चव्हाण, एंजल आरवडे, देवदत्त घुगे, तृप्ती गायकवाड, शिवाणी घोडके हे नुकतेच विविध रुग्णालयांतून उपचार घेऊन घरी आले आहेत, तर सार्थक पवार, हर्ष पवार, पूजा दळवी हे सध्या खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त शहरातील पाइपलाइन रस्ता, सारसनगर, दिल्ली दरवाजा आदी भागातही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. बऱ्याचदा डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना महापालिकेचा आरोग्य विभाग संशयित रुग्ण मानतो. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात तपासणी करूनच रुग्ण डेंग्यूचे असल्याचे सांगितले जाते. पण मनपा आरोग्य विभाग पुन्हा नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतो, तोपर्यंत हा रुग्ण महापालिकेसाठी संशयित असतो.

शहरात डासांचा उपद्रव डोकेदुखी वाढवणारा असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. डास समूळ नष्ट करणे शक्य नसल्याने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. डेंग्यू हा आजार विषाणूजन्य असून तो एडीस डासाच्या चाव्यामुळे होतो. नागरिकांचा मनपा आरोग्य विभाग दवाखान्यांवरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत असल्याने खासगी आरोग्य सेवेकडे कल वाढत आहे. कोणत्याही खासगी रुग्णालयांत डेंग्यूवर उपचार घेण्यासाठी सुमारे २५ हजार रूपये खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मनपाने केले दुर्लक्ष
पंधरादिवसांपूर्वी माझी भाची निकिता चव्हाण हिला डेंग्यू झाला. याबाबत आम्ही महापालिकेला कळवले होते. पण त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. माझी भाची नुकतीच खासगी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी आली आहे. आता माझा मुलगा सार्थक पवार पुतण्या हर्ष पवार या लहानग्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. ते सध्या खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.'' जयदीपपवार, नागरिक.

काय उपाय करावेत?
आठवड्यातूनएकदा कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. घरातील पाण्याचे साठे दिवसाआड कोरडे करावेत. उघड्यावर सांडपाणी सोडू नये. निरुपयोगी खोलगट वस्तू नष्ट कराव्यात. सेफ्टी टँकला कापड अथवा जाळी बांधावी, परिसर स्वच्छ ठेवावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.

कुठे आढळतो डास ?
डेंग्यूचाडास दिवसा चावतो. तो घराच्या भिंतीवर, आडोश्याच्या ठिकाणी आढळतो. या डासांची उत्पत्ती घरातील परिसरातील साठलेल्या पाण्यात होते. या पार्श्वभूमीवर डेंग्यू नियंत्रणासाठी शहर उपनगरांत उपाययोजना करण्याची गरज आहे.

शा‌‌‌ळांमध्ये जागृती मोहीम
महापालिकेनेडेंग्यू नियंत्रणासाठी शाळांमध्ये डेंग्यू जागृती मोहीम हाती घेतली आहे. सर्व आरोग्य केंद्रांचे अधिकारी परिचारिकांना याबाबत निर्देश दिले आहेत. मनपा शिक्षण मंडळ विविध विद्यालयांनी डेंग्यू जागृती मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.

ते आठ रुग्ण संशयितच
शहरातआठ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळांमध्ये डेंग्यूचे निदान झाले असले, तरी आम्ही नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. शहरातील इतर भागातही रुग्ण आढळत आहेत.'' डॉ.सतीश राजूरकर, वैद्यकीयआरोग्य अधिकारी, मनपा.
बातम्या आणखी आहेत...