आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस साजरा करण्यावरून राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून माजी नगरसेवक धनंजय जाधव सूरज जाधव या दोन विरोधी गटांत शनिवारी मध्यरात्री तोफखाना परिसरात तुफान राडेबाजी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. तीन तास चाललेल्या या राड्याचे लोण जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयांतही पोहोचले. तेथेही एकमेकांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात एका रुग्णवाहिकेचेही नुकसान झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी नोंदवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.

पहिली फिर्याद चैतन्य दिलीप जाधव (२८, तोफखाना) याने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास तोफखाना परिसरातील त्यांच्या घरासमोरच्या मारुती मंदिरासमोरील पटांगणात माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्या वेळी सुरज सुभाष जाधव, संदीप सुभाष जाधव, सुशांत सुभाष जाधव, रोहित मुत्याल, अक्षय किरण आडेप, संदीप गुड्डा (सर्व तोफखाना परिसर) इतर २० ते २५ जण तेथे आले. त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम बंद करायला लावला.
चैतन्यचे चुलते प्रताप दत्तात्रेय जाधव हे त्यांना समजावून सांगायला गेले, पण सूरज जाधव याने तलवारीने त्यांच्या डोक्यात वार केला. हा वार चुकवण्यासाठी प्रताप जाधव यांनी उजवा हात आडवा घातल्यामुळे त्यांच्या हातावर तलवारीचा वार होऊन ते जखमी झाले. इतर आरोपींनी तलवार, ित्रशूल, लाकडी दांडके, काचेच्या बाटल्या, तसेच दगडांचा वापर करत मारहाण करून राडेबाजी सुरू केली. जाधव यांना स्वास्थ्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता आरोपींनी तेथे येऊन दुचाकींची तोडफोड केली, तसेच रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेच्याही (एमएच १६ एई ८०००) काचा फोडल्या. चैतन्य जाधव याच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी सूरज जाधवसह सुमारे ३० जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्म अॅक्ट, मारहाण करणे यासह दंगलीचा गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी फिर्याद सुभाष अर्जुन नरसिंग जज्जर (२९, तोफखाना) याने दिली आहे. तो सुभाष जाधव माळ्याची चावडीवर असलेल्या वडापावच्या गाडीजवळ आले असता तुम्ही दुसऱ्याचा वाढदिवस येथे का साजरा करता, या कारणावरुन माजी नगरसेवक धनंजय जाधव इतर साथीदारांनी मारहाण केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अभिमन्यू राजू जाधव, माजी नगरसेवक धनंजय कृष्णा जाधव, मोहसीन शेख, आबा कृष्णा जाधव, राहुल मुथा, राजू द. जाधव, सुमित इपलपेल्ली, अमित नुल्ला (सर्व तोफखाना परिसर) इतर १० ते १२ जणांविरुद्ध दंगल, मारहाण, आर्म अॅक्ट आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला.
शनिवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे तोफखाना परिसरात रात्रभर तणाव होता. रविवारी दिवसभर या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात होता. रविवारी कोणताही गैरप्रकार घडला नाही. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तपास तोफखान्याचे पोलिस उपनिरीक्षक विकास काळे करत आहेत.
पोलिसांसमोरही राडेबाजी
तोफखानापरिसरात वाढदिवसाच्या कारणावरून राडेबाजी सुरू झाल्याची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे, तोफखान्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक आर. डी. निकाळजे हे दोघेही सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडीही पाचारण करण्यात आली. तोवर जखमींना ज्या रुग्णालयात नेले, तेथेही दोन्ही गटांच्या लोकांनी राडेबाजी केली. त्यामुळे पोलिसांचीही पळापळ झाली. ही राडेबाजी मध्यरात्री तब्बल तीन तास सुरू होती. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले. तोफखाना परिसरात काचांचा खच पडला होता.
नेमके कारण काय?
मंदिरासमोरच्या पटांगणात वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यावरून दोन गटांत वादाची ठिणगी पडली. राजकीयदृष्ट्या विरोधी असलेले दोन गट आमने-सामने आले प्रचंड तोडफोड करण्यात आली. या दंगलीला वाढदिवसाचे निमित्त झाले असले, तरी खरे कारण वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. शहरातील बड्या नेत्यांचे वाढदिवस लागोपाठ होते. या दोन्ही नेत्यांचे वाढदिवसाचे शुभेच्छा फलक या परिसरात लावलेले होते. या शुभेच्छा फलकांचेही दंगलीत नुकसान झाले. दोन गटांमध्ये काही दिवसांपासून धुमसत असलेला वाद वाढदिवसाच्या निमित्ताने उफाळून आल्याचे बोलले जात आहे. शहरातील राजकारणाचे विविध पदर या घटनेला असून त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...