आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Administration,Latest News In Divya Marathi

जिल्हा प्रशासनाच्‍या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती कक्षच आपत्तीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, या हेतूने जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती कक्ष सुरू केला खरा, पण हा आपत्ती कक्ष कमी कर्मचा-यांमुळे आपत्तीत सापडला आहे. या कक्षात अवघे सहा कर्मचारी काम करतात. दुर्दैवाने भविष्यात माळीणसारखी (ता. आंबेगाव) दुर्घटना जर जिल्ह्यात घडली, तर हे सहा कर्मचारी त्या स्थितीला तोंड कसे देतील, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. नगर हा क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे. लोकसंख्या 45 लाखांहून अधिक आहे. राहुरी, पाथर्डी, नेवासे वगळता अन्य तालुके किमान दीड तासाच्या अंतरावर आहेत. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व अकोले या तालुक्यांचे अंतर 100 ते 150 किलोमीटर आहे. अकोले हा डोंगरद-यांचा तालुका आहे. या तालुक्यात सर्वाधिक पाऊस होतो. या भागात दरडी मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक गावे डोंगर-द-यांमध्ये वसलेली आहेत. भविष्यात माळीणसारखी पुनरावृत्ती अकोले तालुक्यात झाली, तर नगरहून मदतकार्य जाण्यास सुमारे चार ते पाच तास लागतील.
अकोले तालुक्यात काही वर्षांपूर्वी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती, तरीही प्रशासन अजून सुस्त आहे. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती कक्ष सुरू केला आहे. मात्र, प्रशासनाकडे आपत्ती नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक नाही. जिल्हा प्रशासन हे महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचा-यांवर अवलंबून असते. नैसर्गिक आपत्तीदरम्यान नागरिकांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने आपत्ती कक्षात 1077 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. तथापि, तो नावालाच आहे. हा क्रमांक 24 तास सुरू असायला हवा. त्यासाठी एकूण सहा कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये हे सहा कर्मचारी काम करतात. काळाची गरज ओळखून आपत्ती कक्ष अधिक सक्षम होणे आवश्यक आहे.