आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेसाठी आज मतदान, तीनशे कर्मचारी, शंभरावर पोलिसांचा बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील १५ जागांसाठी मंगळवारी (५ मे) सकाळी ते सायंकाळी दरम्यान जिल्ह्यातील ४२ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. मतदानासाठी ३०० कर्मचार्‍यांचा ताफा शंभरपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी सोसायटी मतदारसंघात नगरमधून आमदार शिवाजी कर्डिले, पारनेरमधून उदय शेळके, राहात्यातून अण्णासाहेब म्हस्के, शेवगावमधून माजी आमदार चंद्रशेखर घुले, पाथर्डीतून माजी आमदार राजीव राजळे राहुरीतून अरुण तनपुरे बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सोसायटी मतदारसंघ राखीव जागांसाठी मतदान होत आहे. काँग्रेस अंतर्गत राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात गटात सत्तेसाठी मोठी चुरस असून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. थोरात गटाला राष्ट्रवादीची साथ मिळाली असून विखे गटाला शेवटच्या टप्प्यात भाजप-शिवसेनेला बरोबर घेण्यात यश आले. मात्र, बिनविरोध निवडून आलेले माजी आमदार राजळे यांच्याबाबत उलटसुलट चर्चा असून ते ऐनवेळी कोणती भूमिका घेतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी मतदानाची जय्यत तयारी केली आहे. मतदान कर्मचारी सोमवारी केंद्रांवर रवाना झाले. मतदान मतपत्रिकेवर शिक्का मारून होणार आहे. सोसायटी, शेतीपूरक संस्था बिगरशेती संस्था या तीन मतदारसंघांतील ३७६१ मतदार मतदान करतील. त्या-त्या मतदारसंघातील उमेदवारांना राखीव मतदारसंघांतील सात उमेदवारांना मतदान होणार आहे. बिनविरोध सहा ठिकाणी सेवा साेसायट्यांचे मतदार केवळ राखीव जागांसाठी मतदान करतील. मोजकी संख्या असल्याने हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी दोन्ही गटांच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मतदान होणार्‍या सेवा सोसायटी मतदारसंघातील बहुतांश मतदार उमेदवार प्रायोजित सहलीचा आनंद घेत असून ते थेट मतदानाच्या वेळीच उगवणार आहेत.

राखीव जागांवर चुरस
सेवा सोसायट्यांमधील मतदार निश्चित आहेत. त्यामुळे दोन अपवाद वगळता या जागांबाबत फारशी उत्सुकता नाही. खरी चुरस राखीव सात जागांवर आहे.