आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुपारपर्यंत निश्चित होणार जिल्हा बँकेचे कारभारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा बँकेच्या १५ संचालक पदांच्या निवडीसाठी गुरुवारी (७ मे) सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या महा सैनिक हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचा निकाल अपेक्षित अाहे. दोन वाजेपर्यंत इतर जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातील जागा बिनविरोध ठरल्या. या मतदारसंघातील उर्वरित शेतीपूरक, बिगरशेती राखीव अशा जागांसाठी मे रोजी मतदान झाले. चुरशीच्या झालेल्या लढतीत ९८.९९ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे निकालाबाबत जिल्हावासियांना उत्सुकता लागली अाहे. मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून ७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वच मतदारसंघाची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. सेवा सोसायटी मतदारसंघाच्या आठ जागांची मतमोजणी दुपारी १२ वाजेपर्यंत संपणार आहे. या मतदारसंघातील मतदान तालुक्यांपुरत मर्यादित असल्याने निकाल लवकर अपेक्षित अाहे. तर शेतीपूरक, बिगरशेती राखीव अशा जागांसाठी सर्वच १४ तालुक्यातील उमेदवार आहेत. मताचे एकत्रिकरण करून दुपारी दोन पूर्वी निकाल लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा विकास आघाडी भाजप-शिवसेना विरूद्ध माजी मंत्री बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी अशी सरळ लढत आहे. रिंगणातील ३५ पैकी उमेदवारांनी जाहीर माघार घेतल्याने ३२ उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीतून ठरणार आहे. विखे थोरात यांनी जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून परस्परांना शह-काटशह देण्याची एकही संधी त्यांनी निवडणुकीत सोडली नाही.

साडेसात वर्षांनंतर झाली निवडणूक
९७व्याघटनादुरुस्तीनुसार प्राधिकरण स्थापन करण्यास झालेल्या विलंबामुळे जवळपास साडेसात वर्षाच्या कालखंडानंतर जिल्हा बँकेची निवडणूक लागली. हजार कोटी रुपयांच्या घरात ठेवी असलेली ही बँक नफ्यात चालणार्‍या राज्यातील मोजक्या बँकांमध्ये समाविष्ट आहे. सध्या बँकेवर थोरात गटाची सत्ता असून तत्पूर्वी विखे गटाकडे बँकेची सत्ता होती. साडेसात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत बदल होतो की सत्ता कायम राखण्यात थोरात गटाला यश मिळते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

बिनविरोध झालेले संचालक : शिवाजी कर्डिले : नगर, उदय शेळके : पारनेर, अण्णासाहेब म्हस्के : राहाता, चंद्रशेखर घुले : शेवगाव, राजीव राजळे : पाथर्डी, अरुण तनपुरे : राहुरी.