नगर - जिल्हा बँकेच्या १५ संचालकपदांसाठी मंगळवारी मतदान सुरळीत पार पडले. राधाकृष्ण विखे भाजप-शिवसेनेची जिल्हा विकास आघाडी विरुद्ध बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास मंडळात झालेल्या चुरशीच्या लढतीने यंदा मतदानाचा टक्का वाढला. एकूण ९९ टक्के मतदारांनी
आपला मतदानाचा हक्क बजावला असून दोन्ही गटांनी मतदान घडवून आणण्यासाठी चांगलीच धावपळ केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा शेवटच्या क्षणी चांगलीच रंगत आली. सुरुवातीला पारंपरिक विरोधक असलेल्या विखे थोरात गटासोबतच भाजपही रणांगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, थोरात यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांना हाताशी धरून भाजपला जवळ करत आघाडी घेतली होती. थोरात गटाचे पारडे जड दिसताच विखे यांनी तडजोडीची भूमिका स्वीकारल्याची खेळी करत शरणागती पत्करली. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी रंगलेल्या या खेळीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्यासह काही दिग्गज निवडणुकीच्या रिंगणातून हद्दपार झाले. मुख्यमंत्र्यांची मदत घेत विखे यांनी भाजपला सोबत घेण्याची दुसरी खेळी केली. भाजपसोबत शिवसेनेलाही सोबत घेण्यात त्यांना यश आले. यातून जड झालेले थोरात गटाचे पारडे विखे गटाकडे झुकल्याचे चित्र निर्माण करण्यात विखे यशस्वी झाले.
कार्यकर्त्यांची धावपळ
शेवटच्या क्षणी चुरस वाढल्याने एकेका मतदाराला महत्त्व प्राप्त झाले. यातून मतदान घडवून आणण्यासाठी दोन्ही गटांच्या यंत्रणांनी पद्धतशीर प्रयत्नांना गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात केली. मतदानाच्या दिवशी मंगळवारी या यंत्रणांनी आपापल्या गटासाठी अधिकाधिक मतदान घडवून आणण्यासाठी चांगलीच धावपळ केली. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. १४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकाच शाळेत विविध कार्यकारी सेवा सोसायटी, शेतीपूरक संस्था बिगरशेती संस्था अशी तीन स्वतंत्र मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
दहाते बारा दरम्यान सर्वाधिक मतदान
सकाळीते १० या दोन तासांत ३१.५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर सकाळी १० ते १२ दरम्यान सर्वाधिक ३८.४५ टक्के मतदारांनी मतदान केले. दुपारी १२ ते दरम्यान १६.५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर शेवटच्या चार तासांतील पहिल्या दोन तासांत ९.६२ त्यानंतर दोन तासांत २.७१ टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी ३,७६० मतदार ग्राह्य धरण्यात आले होते. त्यातील अवघ्या ३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. उर्वरित हजार ७२२ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांच्या ९९ टक्के मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला.
निकालाकडे लक्ष
विखे थोरात या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये निवडणुकीत चुरशीची लढत झाली. या दोन दिग्गज नेत्यांनी परस्परांना शह-काटशह देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे गुरुवारच्या मतमोजणीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते एका बाजूला थोरात, माजी मंत्री मधुकर पिचड, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, आमदार अरुण जगताप दुसर्या बाजूला असा हा सामना रंगला. यात कोण बाजी मारतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उद्या नगरमध्ये मतमोजणी
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सील केलेल्या मतपेट्या नगरमधील चांदणी चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या महा सैनिक हॉलमध्ये आणण्यात येत होत्या. याच ठिकाणी गुरुवारी (७ मे) सकाळी वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी मतदानानंतर मतमोजणीसाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोपरगावात सर्वात कमी मतदान
मतदान प्रक्रियेत एकूण मतदारांपैकी अवघ्या ३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. यातील सर्वाधिक मतदार कोपरगाव तालुक्यातील आहेत. विविध कार्यकारी सेवा सोसायटीत १, शेतीपूरक संस्था मतदारसंघात बिगरशेती संस्था मतदारसंघातील १३ मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला नाही. उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये एक-दोन अपवाद वगळता सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.