आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक रणधुमाळी : शेवटच्या दिवशी आठवला विकास...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तीव्र चुरशीमुळे मोठमोठ्या बँकांच नव्हे, तर शहरातील छोट्या पतसंस्थाही अत्याधुनिक सुविधा देऊन ग्राहकांना आपलेसे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. याउलट पाच हजार कोटींच्या घरात ठेवी असलेल्या एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी बँकेचे बिरूद मिरवणार्‍या जिल्हा सहकारी बँकेकडे साध्या एटीएमची सुविधा नाहीत. ग्राहकांसाठी सुविधा हा मुद्दाच यंदाच्या निवडणूक प्रचारात गायब असल्याचे "दिव्य मराठी'ने समोर आणल्यानंतर रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जिल्हा विकास भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीच्या पहिल्याच मेळाव्यात विकासाचा सूर आळवण्यात आला. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेला तोंड देण्याबरोबर बँक ग्राहकाभिमुख बनवण्याचे आश्वासन देत मतदारांना साद घालण्यात आली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठीच्या जाहीर प्रचाराची रविवारी सांगता झाली.

प्रचारात बाळासाहेब थोरात गट राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील शेतकरी विकास आघाडीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. गेल्या साडेसात वर्षांपासून बँकेवर थोरात गटाची सत्ता आहे. सत्ता कायम राखण्यात थोरात गटाने आघाडी मारल्याचे चित्र असतानाच राधाकृष्ण विखे यांनीही जोरदार प्रतिहल्ला चढवत थेट मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधत भाजपला सोबत घेण्याची खेळी अखेरच्या क्षणी यशस्वी केली. भाजपसोबत शिवसेनेची साथही मिळवण्यात त्यांना यश आले. प्रचार संपण्याच्या शेवटच्या िदवशी विखे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा विकास आघाडी भाजप शिवसेनेचा मेळावा नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे घेण्यात आला. थोरात गटाकडून जाहीर प्रचारात केवळ विखे गटावर टीका करणारा प्रचार झाला, तर विखे भाजपकडून बँकेत केवळ तोंड पाहून कर्ज वितरण होते असे प्रत्त्युतर देण्यात येत होते.

बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून वेगवान बदल घडत आहेत. त्यात जिल्ह्यातील शेतकरी शेतीपूरक उद्योगांसाठी कामधेनू ठरलेल्या जिल्हा बँकेतील सुविधांबाबत दोन्ही गटांकडून चकार शब्द निघत नसल्याकडे "दिव्य मराठी'ने लक्ष वेधले होते. पाच हजार कोटींच्या घरात ठेवी असलेल्या या बँकेत साधी एटीएम सुविधा, तसेच नेट, मोबाइल बँकींग या प्राथमिक समजल्या जाणार्‍या सोयी नसल्याचे "दिव्य मराठी'ने समोर आणले. बदलत्या परिस्थितीत स्पर्धेला तोंड देत नवीन ग्राहक शोधणे तर दूरच, नाइलाजाने ग्राहक असलेला शेतकरीही बँकेच्या सेवेत समाधानी नसल्याचे सध्याचे चित्र वाचकांसमोर मांडण्यात आले. बँकेची निवडणूक आली की, परस्परांना शह देण्यासाठी जीवाचे रान करणारे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते विखे थोरात गटात विभागले जातात परस्परांवर तोंडसुख मिळवण्यात धन्यता मानतात, हे वास्तव सभासदांच्याही लक्षात आले.

या पार्श्वभूमीवर शेतकरी विकास आघाडी भाजप-सेनेच्या मेळाव्यात बँकेकडे अत्याधुनिक सुविधांची वाणवा असून त्या देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. वैयक्तिक टीका टिप्पणीला फाटा देत प्रमुख वक्त्यांनी बँकेकडून देण्यात येणार्‍या सध्याच्या सुविधा त्यातील सुधारणांवर अधिक भाष्य केले. शेवटच्या टप्प्यात का होईना बँकेच्या सुविधांचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेत आला. पक्षश्रेष्ठी पक्षाने दिलेल्या आदेशामुळे विखे गटासोबत आलेल्या आमदार शिवाजी कर्डिले यांनी मात्र विखे यांनाच टोले लगावण्याची संधी सोडली नाही.

पालकमंत्री शिंदे, विरोधी पक्षनेते विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, बिपीन कोल्हे, नंदकुमार झावरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, भाऊसाहेब वाकचौरे, अशोक भांगरे, डॉ. सुजय विखे, सुभाष पाटील यांच्यासह जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार, नेते जिल्हाभरातून आलेले मतदार कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजीव राजळे यांची दांडी
पाथर्डी तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार राजीव राजळे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपने विखे गटाबरोबर जात रविवारी घेतलेल्या मेळाव्याला मात्र राजळे यांनी दांडी मारली. घरगुती पूजेमुळे राजळे अनुपस्थित असल्याचे स्वत: विखे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. राजळे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

विखेंनी दिलेला शब्द पाळावा...
आमदार कर्डिले यांनी विखे यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. विखे हे दिलेला शब्द पाळत नाहीत असे सांगितले जाते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप-सेना सोबत येण्यासाठी त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असे कर्डिले म्हणाले. विखे गटाची सत्ता आल्यास कर्डिले यांना बँकेचे अध्यक्ष करण्याचा शब्द विखे यांनी दिल्याची चर्चा होती.

सेवा सोसायट्यांचे मतदार सहलीवर
सेवा सोसायटी मतदारसंघातील १४ पैकी जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी मे रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात किमान ४८ कमाल १३३ मतदार आहेत. कोणताही धोका नको, म्हणून या मतदारांना सहलीवर घेऊन जाणे उमेदवारांनी पसंत केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जवळपास ८० टक्के मतदार सहलीवर असून थेट मतदानाच्या वेळी ते उगवणार आहेत.

विजयानंतर तिखटाचे जेवण
मेळाव्यानंतरजेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. यावर आमदार कर्डिले म्हणाले, विखे यांनी गोडाचे जेवण ठेवलेले दिसते. जिल्हा विकास आघाडी भाजप-सेनेची संयुक्त आघाडी विजयी झाल्यानंतर आपल्याकडून तिखटाचे जेवण देऊ, असा चिमटा कर्डिले यांनी काढला.

तिघांची माघार पाठिंबा
भटक्याजमाती, विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून माघार घेऊन जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे शिवाजी शेलार यांनी मेळाव्यात जाहीर केले. याच मतदारसंघातून बाजीराव गेणूजी खेमनर यांनी माघार घेतली. या दोघांनीही विखे गटाचे सुभाष रावबा गिते यांना पाठिंबा दिला. श्रीगोंदे तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून बाबासाहेब भोस यांनीही माघार घेत विखे गटाच्या दत्ता पानसरे यांना पाठिंबा दिला.

सोसायट्या बुडीत; बँक मोठी
बँकेत कधी राजकारण केले नाही. मी अध्यक्ष असताना संगणकीकरण केले. नंतर काहीही झाले नाही. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन नाही की एटीएमची सुविधा नाही. पाया असलेल्या सोसायट्या बुडाल्या अन् बँक मोठी झाली. बँकेसोबत सोसायट्याही वाढल्या पाहिजेत. सोसायटीच्या सचिवाला बँकेचा कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे. ऑनलाइन बँकिंग करून लोकांचे हेलपाटे कमी व्हावेत. भाजप-सेनेबरोबर अंधारात आलो नाही, तर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून राजरोस आलो आहे.'' राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते.

विखेंचे सुदर्शन चक्र सुटले
भाजप-सेनाविखे गटाबरोबर आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सहकाराचे खासगीकरण करणार्‍यांच्या हाती सत्ता सोपवू नका. विखेंेचे सुदर्शन चक्र सुटल्यानंतर जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याचे राजकारण बदलते. जिल्हा बँकेतही याची प्रचिती येणार आहे. यापुढील काळात जिल्हा मध्यवर्ती सहाकीर बँकेतील सत्तेचे विकेंद्रीकरण होण्याची आवश्यकता असून सोसायटीच्या सचिवांना अधिकार देण्याची गरज आहे. '' राम शिंदे, पालकमंत्री.

बँकेनेही राजकारण करू नये
बँकेने यापूर्वी काही बाबतीत राजकारण केले आहे. साखर कारखान्यासाठी कर्ज मागण्यासाठी आल्यानंतर कारखाना खासगी असल्याचे सांगत कर्ज नाकारले. इतर ठिकाणहून मिळालेल्या कर्जावर गेल्या बारा वर्षांत ४८ कोटी ५० लाख रुपयांचे व्याज भरले आहे. हे जिल्हा बँकेचे झालेले नुकसान आहे. यापुढे असे राजकारण होऊ नये. ऊस उत्पादकांसोबतच जिरायत शेतकर्‍यांनाही बँकेचा लाभ मिळावा. श्रीगोंद्यात गट-तट एरव्हीचे राजकारण बाजूला सारून विखे गटासोबत एकत्रितपणे जात आहोत'' बबनराव पाचपुते, माजी मंत्री.

व्याह्यांमुळे बिनविरोध प्रयत्न
एक व्याही थोरात, तर दुसरे व्याही विखे गटात असल्याने माझी अडचण होती. त्यामुळेच बिनविरोधसाठी प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अर्ज माघारीच्या दिवशी थोरात, विखे पिचड यांच्यात एकमत होऊन निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, काय फिस्कटले माहीत नाही. दाेन्ही व्याही काका (आमदार अरुण जगताप), कोतकर (सुरेखा भानुदास कोतकर) थोरात गटाकडे असतानाही पक्षाच्या आदेशनुसार मी विखे गटाबरोबर राहणार आहे. कारण माझे संपलेले राजकारण भाजपने जिवंत ठेवले आहे.'' शिवाजी कर्डिले, आमदार.