आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक : आता पदाधिकारी निवडीचे नाट्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - काठावरच्या बहुमताने जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीत यंदा चांगलीच चुरस दिसणार आहे. दुसरीकडे आमदार शिवाजी कर्डिले यांनी पदाधिकारी निवडीत चमत्काराचे आव्हान देऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीला सावध पावले टाकण्यास भाग पाडले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्षपदांच्या निवडीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासात यावेळी झालेली निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली. बँकेच्या सत्ताकारणातील पारंपरिक विरोधक थोरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात पहिल्यांदाच आरोप-प्रत्यारोपाचे नाट्य निवडणुकीच्या निमित्ताने घडले. निकालानंतर दोन्ही नेत्यांनी आपापल्या यशावर समाधान व्यक्त करताना पुन्हा परस्परांवर टीकास्त्र सोडले.

भाजप-शिवसेनेला सोबत घेऊन विखे यांनी पक्षाची प्रतिमा बिघडवल्याचा कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण केल्याच्या टीकेवर थोरात यांनी अधिक भर दिला. यातून विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात यावे, हाच उद्देश होता. त्यामुळेच निकालानंतर थोरात यांनी जिल्हा बँकेत मुख्यमंत्री, पालकमंत्री विरोधी पक्षनेत्याचा पराभव केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. थोरात यांच्या बरोबर असणारे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदासाठी विखे थोरात यांच्यातच चुरस होती. गटनेतेपदी थोरात यांची निवड निश्चित मानली जात असताना विखे यांनी हे पद खेचून आणण्यात यश मिळवले. त्यावेळची खदखद विखे थोरात यांच्याकडून या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरच टीका केल्याचे कारण पुढे करून थोरात यांच्यविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची संधी विखे गटाने सोडलेली नाही.

निसटत्या बहुमतामुळे थोरात गटाला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत कमालीची सावध भूमिका घेणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी सर्वसमावेशक चेहरा पुढे करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक पसंती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनाच मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आमदार कर्डिले यांनी निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना पदाधिकारी निवडीत चमत्कार घडेल, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

काठावरील बहुमत सोयर्‍याधायर्‍यांच्या राजकारणाचा पदर असलेल्या या जिल्ह्यात काहीही घडू शकते. त्यामुळेच भूमिका जाहीर केलेले राजीव राजळे आपल्याबरोबरच असल्याचे सांगताना भाजपने त्यांचे संपलेले राजकारण उभे केल्याचा इशारा कर्डिले यांनी दिला आहे. राजळे सोबत आल्यास एका जागेसाठी थोरात गटाला सुरुंग लावण्याची खेळी विखे गटाला करावी लागेल. मात्र, ही खेळी सहजशक्य नाही. थोरात गटाऐवजी विखे गटातच तोडफोड होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

थोरातांकडे आज बैठक
बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीच्या नेत्यांची शनिवारी संगमनेर येथे बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाबाबत प्राथमिक चर्चा होईल. मधुकर पिचड यांच्यासह थोरात गटाच्या शेतकरी विकास मंडळाचे ११ नवनिर्वाचित संचालक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह थोरात राष्ट्रवादीत सत्तेच्या कार्यकाल विभागणीवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

आठवडाभरात अधिसूचना
जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आठवडाभरातच अधिसूचना निघणार आहे. अधिसूचनेनंतर जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची सभा घेण्यात येईल. अधिसूचनेतूनच सभेचा दिवस वेळ स्पष्ट होणार आहे. १५ दिवसांच्या आत निवडप्रक्रिया होणार असल्याची माहिती हौसारे यांनी दिली.

राजळे यांच्या भूमिकेकडे लक्ष
राजीव राजळे भाजपबरोबर असल्याचे निकालानंतर आमदार कर्डिले यांनी सांगितलेे. मात्र, राजळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. निसटते बहुमत आमदार कर्डिले यांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन थोरात गटाकडून राजळेंचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. नात्यागोत्याच्या राजकारणाची परंपरा मतदानातून पुढे आली असून पदाधिकारी निवडीतही त्याचा प्रत्यय येऊ शकतो.

फॉर्म्युला पूर्वीच निश्चित
जिल्हा सहकारी बँकेतील सत्तावाटपाचा फार्म्युला पूर्वीच निश्चित करण्यात आलेला आहे. सर्वाधिक जागा असणार्‍यांकडे अध्यक्षपद देण्याचे ठरले आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संगमनेर येथे होणार्‍या बैठकीत यासंदर्भात चर्चा होईल.'' पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी.
बातम्या आणखी आहेत...