आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज भरल्यानंतरच बसणार तडजोडीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांकडून गोपनीय बैठका घेतल्या जात आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरच युती-आघाडीच्या तडजोडी करण्याचे शिक्षक नेत्यांनी ठरवले आहे. तोपर्यंत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरून इच्छुकांची संख्या वाढल्याचे दाखवण्यासाठी नेत्यांची धावपळ उडाली आहे. 
शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. आतापर्यंत ९६६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. ५५७ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (२९ जानेवारी) शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी सदिच्छा मंडळाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी गुरुकुल, ईब्टा, गुरुमाउली, ऐक्य मंडळाने तयारी सुरू केली आहे, तर सदिच्छा मंडळानेही पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी गनिमी काव्याने घोंगडी बैठका घेण्यास सुरू केले आहे. सध्यातरी सर्वच मंडळे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची वल्गना करीत आहेत. २५ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षक नेत्यांनी जिल्हा पिंजून काढला असून तालुकानिहाय चाचपणी पूर्ण केली आहे. यासाठी कार्यालय भाडेतत्त्वावर घेऊन दूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जागा अवघ्या २१ असताना उमेदवारी अर्जाच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. 

गुरुकुल, गुरुमाउली, सदिच्छा, इब्टा, ऐक्य मंडळांनी जोरदार तयारी केली आहे. गोपनीय बैठकांनाही गती देण्यात आली आहे. समविचारी मंडळांना बरोबर घेऊन जाण्यासाठी काही मंडळे तयार आहेत. काही दिवसांपूर्वीच गुरुमाउली मंडळाला एका मंडळाच्या नेत्याने आमच्यात विलीन होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण हा प्रस्ताव गुरुमाउलीने धुडकावल्यात जमा आहे. मंडळ नवीन असले तरी सत्तेवर येण्याचा दावा या मंडळाकडून केला जातोय. गुरुकुलची जुळवाजुळव करण्यासाठी नेते संजय कळमकर यांचे प्रयत्न सुरू असताना, इतर मंडळांनी समांतर गुरुकुलला गोटात खेचण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सदिच्छा मंडळ अजूनही महाआघाडी करण्याच्या तयारीत आहे. आघाडीच्या तडजोडी करताना सर्वच मंडळांनी १० ते ११ जागा मिळवण्याचा आग्रह धरला. त्यामुळेच आघाडीची अडचण वाढली आहे. बहुतेक मंडळांनी इब्टा आमच्या संपर्कात असल्याचा दावा खासगीत बोलताना केला, पण ईब्टा इतर मंडळांवर टीका करण्याची संधी सोडत नाही, तर गुरुमाउलीने कोणावरही टीका करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रचाराच्या तोफा धडाडताना खालच्या पातळीवर टीका झाली, तरी मौन पाळण्याचा प्रयत्न गुरुमाउली करणार आहे. 

सदिच्छा, गुरुकुल, ईब्टा, ऐक्य, गुरुसेवाची महाआघाडी 
^आमच्या गुरुकुल,ईब्टा, ऐक्य, गुरुसेवा या मंडळांशी प्राथमिक चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. महाआघाडी झाली, तरी गुरुमाउली रिंगणात असेल त्यामुळे बिनविरोध होणार नाही. महाआघाडीसाठी आम्ही सकारात्मक आहोत.\'\' राजू शिंदे, नेते,सदिच्छा. 

निर्णय अंतिम नाही 
^सदिच्छा मंडळाबरोबर आमची चर्चा झाली, पण युतीचा निर्णय अंतिम नाही. तसेच गुरुमाउलीशी, तर चर्चाच झाली नाही. सर्व जाती धर्माला स्थान देण्याची आमची भूमिका आहे, जर ही भूमिका इतर समविचारींना पटली, तर बरोबर घेऊ. इब्टाशी चर्चा करण्याची तयारी आहे. आमच्यातीलच काहींची नाराजी आम्ही दूर केली.\'\' संजय कळमकर, नेता,गुरुकुल. 

..ते विचारी होऊ शकत नाहीत 
^जिल्ह्यात सक्षमपणे पॅनेल देणार येणार असून तालुक्यातून दहा ते पंधरा जणांनी अर्ज घेतले. सदिच्छा, गुरुमाउली, गुरुकुल सत्तेसाठीच एकाच मंडळातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ते आमचे समविचारी होऊ शकत नाही. आम्ही पंधरा वर्षांपासून बाहेर राहून विरोध केला. आमचे मतदान वाढत आहे.\'\' भागवत लेंडे, ईब्टा.

कोअर कमिटी निर्णय घेईल 
^आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, पण त्यापूर्वी आम्ही स्वतंत्र पॅनेल देणार आहोत. जागेची तडजोड करताना जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. रविवारी (३१ जानेवारी) आमच्या कोअर कमिटीची बैठक होईल, त्यात आघाडीचा निर्णय घेऊ.\'\' राजेंद्र निमसे, नेते,ऐक्य मंडळ.