नगर- महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर डागवाले, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी अपक्ष नगरसेविका नसीम शेख यांची मंगळवारी निवड झाली. स्थायीच्या 16 पैकी 10 सदस्यांनी हात उंचावून डागवाले यांच्या बाजूने कौल दिला. शेख यांची निवड मात्र बिनविरोध झाली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती राष्ट्रवादीच्या नगरसेविका कलावती शेळके यांचीही बिनविरोध निवड झाली.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता विशेष सभा झाली. यावेळी आयुक्त विजय कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, प्रभारी उपायुक्त विश्वनाथ दहे, नगरसचिव मिलिंद वैद्य आदी उपस्थित होते.
सुरूवातीला स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी निवड प्रक्रिया झाली. या पदासाठी राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले व शिवसेनेच्या गटातील अपक्ष नगरसेवक सचिन जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला. डागवाले यांच्या बाजूने 10 सदस्य असतानाही जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. शेवटी हात उंचावून मतदान घेण्यात आले. डागवाले यांच्या बाजूने राष्ट्रवादी व अपक्ष विकास आघाडी, तसेच काँग्रेसच्या 10 सदस्यांनी मत नोंदवले. जाधव यांच्या बाजूने शिवसेनेसह भाजपच्या 6 सदस्यांनी मत नोंदवले. त्यामुळे पीठासीन अधिकारी कवडे यांनी स्थायीच्या सभापतिपदी डागवाले यांची निवड जाहीर केली.
स्थायी सभापतीची निवड प्रक्रिया झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या गटातील अपक्ष नगरसेविका नसीम शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज होता. उपसभापती पदासाठी केवळ शेळके यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे विरोधी गटातील सदस्यांनी या निवड प्रक्रियेकडे पाठ फिरवली. पीठासीन अधिकार्यांनी शेख यांची सभापतिपदी, तर शेळके यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड केली. निवड पक्रिया पूर्ण झाल्यानंतर डागवाले यांच्यासह शेख व शेळके यांनी पदभार स्वीकारला.