नगर - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला वेग आला आहे. शेरास सव्वाशेर उमेदवार देण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादी स्वबळाची भाषा करत असले, तरी या दोन्ही पक्षांतील आघाडीचा निर्णय श्रेष्ठींच्या कोर्टातच होणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांचा राज्यात मित्रपक्ष शिवसेनादेखील सर्व जागा ताकदीनिशी लढवण्याच्या तयारीत आहे.
जिल्ह्यातील एकूण ७३ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी निवडणूक होणार आहे. आरक्षणाच्या सोडतीत जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचे गट राखीव झाले आहेत. त्यांनी सोयीनुसार पंचायत समितीच्या खुल्या असलेल्या गणांमधील जागांवर चाचपणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेच्या २०१२ मधील ७५ गटांसाठी झालेल्या निवडणुकीत युती, आघाड्यांवर मोठा काथ्याकूट झाला होता, पण ऐनवेळी स्वबळावरच निवडणुका लढवल्या गेल्या. या निवडणुकीत काँग्रेसने २८, तर राष्ट्रवादीने ३२ जागांवर विजय मिळवला. पण जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीने शिवसेना भाजपशी हातमिळवणी करून दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक समिती दिली. अध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे, तर उपाध्यक्षपदी मोनिका राजळे होत्या.
राज्यात केंद्रात त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असतानाही नगरच्या जिल्हा परिषदेत अडीच वर्षे काँग्रेस विरोधी बाकावर बसले. पुढील अडीच वर्षांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी करून कारभार सुरू केला. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या मंजूषा गुंड अध्यक्ष, तर काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार उपाध्यक्ष आहेत.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. केंद्रात राज्यात युतीचे सरकार अस्तित्वात आले. नगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपने ठसा उमटवला. त्यामुळे जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे.
प्रदेश पातळीवर भाजप शिवसेनेत धुसफूस सुरूच आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेने अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही. दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे यांनी तालुकास्तरावर आघाड्यांना परवानगी दिली असल्याचे चार दिवसांपूर्वीच स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वबळाचा सूर अळवताना आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपवला. मागील निवडणुकांत ज्यांनी पदाधिकाऱ्यांचा मान ठेवून रिंगणातून माघार घेतली होती, त्यांना यावेळी तिकिटाची अपेक्षा आहे.
प्रस्थापितांनाही पुन्हा संधी हवी आहे. पण दोन्ही काँग्रेसने आघाडी केल्यास पक्षश्रेष्ठींना तिकीट वाटपात मोठी कसरत करावी लागेल. दुसरीकडे भाजपने स्वबळाची भाषा सुरू केल्याने शिवसेनेने चाचपणी सुरू केली. आघाडी तसेच युती होवो अथवा होवो, पण स्थानिक नेत्यांनी स्वबळासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. कार्यकर्त्यांचे मेळावे, लहान-मोठे कार्यक्रम घेण्यावर सर्वच राजकीय पक्षांनी भर वाढवला आहे.
शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत
^भारतीय जनता पक्षाने स्वबळाची भाषा केली आहे. त्यामुळे आम्हीदेखील स्वबळावरच निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहोत. जिल्हा परिषदेच्या सर्व गटांत शिवसेना लढण्याची तयारी करत आहे.'' शशिकांतगाडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
पक्षांचे श्रेष्ठी ठरवतील तोच होणार निर्णय
^राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी केली आहे. त्यानुसार नियोजनही सुरू आहे. पण आघाडीबाबत अंतिम निर्णय श्रेष्ठी घेणार आहेत. श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.’’ चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
७३ जागा लढवणार
^आम्ही स्वबळावरच निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यात मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजप ७३ जागा लढवणार आहे. मित्रपक्षांनी योग्य मागण्या ठेवल्या, तर सन्माननीय तोडगा काढून एकत्र येण्याचा विचार केला जाऊ शकतो.'' भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप.