आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला जिल्हा परिषद पगारातून कर्जाचे हप्ते कपात करून देते. त्या बदल्यात जिल्हा परिषदेच्या काही जणांना कमिशन मिळते, असे वर्तमानपत्रांत छापून आले. जिल्हा परिषदेची बदनामी केल्याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा. पुढील काळात बँकेकडून वसुली करून दिल्याबद्दलचे मानधन घेऊन जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवा, असा सूर जिल्हा परिषद सभागृहात अाळवण्यात आला.
कर्जवसुलीपोटी जिल्हा बँकेकडून दरमहा साठ हजार रुपये दिले जात असल्याचा विषय ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम मांडला होता. हे साठ हजार जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा करता काही कर्मचाऱ्यांना दिले जात असल्याकडेही लक्ष वेधले होते. सभापती संदेश कार्ले यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाला प्रश्न विचारला. दरमहा साडेबारा कोटी जिल्हा परिषद कर्ज हप्त्यापोटी शिक्षक बँकेला वसूल करून दिले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर संतप्त सदस्यांनी हे जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत मानधन जमा करून घ्यावे अशी मागणी केली. कार्ले यांनी पगाराचे खातेच शिक्षक बँकेत वळवण्याची सूचना मांडली. त्यावर मार्गदर्शन घेऊन निर्णय घेण्याचे ठरले.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी जिल्हा परिषदेने कर्जहप्ते वसुलीबाबत हमीपत्र बँकेला दिले आहे असे सांगितले. त्यावर हराळ यांनी हे हमीपत्र कोणाच्या अधिकारात दिले, असा सवाल केल्यानंतर शिक्षणाधिकारी निरुत्तर झाले. जिल्हा परिषदेच्या काही लोकांना बँकेतून कमिशन मिळते अशा बातम्या वर्तमानपत्रांतून आल्या असल्याने जिल्हा परिषदेची बदनामी झाली. याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष मंजूषा गंुड. समवेत उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती शरद नवले, बाबासाहेब दिघे, मीरा चकोर, नंदा वारे. छाया : मंदार साबळे.

१०७ शिक्षकांवर कारवाई करा
जिल्ह्यातील १०७ शिक्षकांनी जातवैधता प्रमाणपत्र दिले नसल्याने रोस्टर (बिंदुनामावली) रखडले आहे. संबंधित शिक्षकांना नोटिसा बजावल्या असल्या, तरी आता कठोर कारवाई करा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. निलंबित शिक्षकांना पुन्हा नियुक्त्या देताना त्यांची सोय पाहता प्रशासकीय गरजेनुसार नियुक्त्या दिल्या जातील, असेही स्पष्ट केले.

कौठाप्रकरणी उपोषणाचा इशारा
श्रीगोंदे तालुक्यातील कौठा येथील शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा प्रश्न सदस्य प्रतिभा पाचपुते यांनी मांडला. शाळेला ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहे. तोडगा निघत नसल्याने कौठा ग्रामस्थ उपोषण करतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर तत्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...