आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी कपातीने पदाधिकारी संतप्त, पुढील नियोजनच्या सभेत करण्यात येणार विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हावार्षिक योजना आराखड्यात जिल्हा परिषदेच्या ३२ कोटींच्या निधीची कपात प्रस्तावित केल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना दणका बसला. एकूण मागणी नोंदवता मागील मंजूर मागणीची आकडेवारी घेऊन त्यातही निम्माच निधी देण्याचा घाट नियोजन समितीने घातला आहे, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. नियोजन समितीचे सदस्य असलेले जिल्हा परिषदेचे ३३ सदस्य पुढील सभेत कडाडून विरोध करणार आहेत.

जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असतानाच वार्षिक योजना आराखड्यात ३२ कोटींची कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. अंगणवाडी आरोग्य केंद्र, उपकेंद्र, इमारत बांधकाम, जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण पाणीपुरवठा आदी योजनांत कपात झाली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला या माध्यमातून दणका दिल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड मंत्री शिंदे हे एकाच मतदारसंघातील असल्याने नियोजन आराखड्यात कुरघोडी केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. नियोजन समितीमधील ३३ सदस्य हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. या सदस्यांनीही या प्रस्तावाला विरोध कसा केला नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. निधी कपातीचा विषय चर्चेत अाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना जाग आली. निधी कपातीला विरोध करण्याची भूमिका अध्यक्ष गुंड यांनी घेतली आहे.

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषदेला वगळण्यात आले. हा निधी थेट ग्रामपंचायतीला देण्यात आला. जलयुक्त शिवारच्या कामातही जिल्हा परिषदेला डावलण्यात आले. केंद्राच्या राज्याच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या बहुतेक योजनाही राज्याच्या कृषी विभागाकडे वळवण्यात आल्या. त्यातच ३२ कोटींचा निधीही कपात करण्यात आल्याने पदाधिकारी संतापले आहेत. जिल्हा परिषदेने केलेली मागणी कमी निधीची दाखवून त्यातही निम्माच निधी देण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केला आहे. सोमवारी झालेल्या समन्वय सभेत या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन निधी कपातीला विरोध करण्याचा निर्णय घेतला.

पुढील सभेत आम्ही प्रस्तावित कपातीला विरोध करणार आहोत. प्रसंगी कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाण्याची भूमिका घेऊ, असे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले.

"नियोजन'कडे तक्रार
निधीला कात्री लावल्याप्रकरणी अध्यक्ष गुंड यांच्यासह उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, नंदा वारे यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा नियोजन अधिकारी के. बी. जोशी यांना निवेदन देऊन वाढीव तरतूद करण्याची मागणी केली.

मागणी प्रस्ताव (लाख)
योजनामागणी प्रस्तावित
{जनसुविधा१२०० ६००
{तीर्थक्षेत्र ८०० ६००
{पेयजल २९५५ २५५१
{शाळा दुरुस्ती ७०० १००
{आरोग्य केंद्र १२०० ३००
{उपकेंद्र ५०० १५०
{केंद्र दुरुस्ती १५० १००
{पशु दवाखाना ९०० २५०
{अंगणवाड्या १५०० ७००