आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीमध्ये बिघाडी करण्यात अपयश, जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजूषा गुंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेत असंतुष्टांची स्वतंत्र आघाडी, काँग्रेसचा अध्यक्षपदावर दावा अशा सर्व शक्यता फोल ठरवून काँग्रेस व राष्ट्रवादीने केलेली आघाडी एकसंध राहिली. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजूषा गुंड, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अण्णासाहेब शेलार यांची रविवारी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे असा फॉर्म्युला काही दिवसांपूर्वीच काँग्रेस व राष्ट्रवादीतील संयुक्त बैठकीत ठरला होता.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी रविवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीकडून सुरुवातीला योगिता राजळे, अश्विनी भालदंड, मंजूषा गुंड, कालिंदी लामखेडे आदी नावे चर्चेत होती. अध्यक्षपद पदरात पडावे, यासाठी सर्वच इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. उपाध्यक्षपदासाठी अण्णासाहेब शेलार, अ‍ॅड. सुभाष पाटील, बाळासाहेब हराळ, परमवीर पांडुळे यांची नाव चर्चेत होती; पण मागील दोन दिवसांत पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्याने प्रत्यक्ष निवडीच्या वेळी प्रत्येकी एकच नाव समोर आले. गुंड व लामखेडे यांच्यात अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. शनिवारी रात्री काँग्रेस व राष्ट्रवादीची बैठक सुरू असताना पाचपुते, मुरकुटे, कर्डिले गट स्वतंत्र आघाडी तयार करणार या चर्चेने जोर धरला होता. राष्ट्रवादीतील असंतुष्ट ११, काँग्रेसमधील १३ व इतर २ असे संख्याबळ जुळवून स्वतंत्र आघाडी करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडीच्या वेळी काय होईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तथापि, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सदस्यांनी धीर सोडला नाही.
रविवारी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. अकरा ते एक दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. शिवसेनेच्या सुरेखा शेळके यांच्यासाठी चित्रा बर्डे, कालिंदी लामखेडे यांच्यासाठी विश्वनाथ कोरडे, तर मंजूषा गुंड यांच्यासाठी मावळते अध्यक्ष विठ्ठल लंघे सूचक होते. उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे अशोक आहुजा यांच्यासाठी दत्तात्रेय सदाफुले, काँग्रेसच्या अण्णासाहेब शेलार यांच्यासाठी बाळासाहेब हराळ व कुंडलिक जगताप हे सूचक होते. दुपारी तीन वाजता विशेष सभेत प्रत्यक्ष निवड होणार होती. पावणेतीनच्या सुमारास राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजपचे सदस्य सभागृहात दाखल झाले. भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची विनंती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या लामखेडे, शेळके यांनी माघार घेतली. गुंड यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे कवडे यांनी जाहीर केले. उपाध्यक्षपदासाठी आहुजा यांनी माघार घेतल्याने शेलार यांची बिनविरोध निवड झाली.
बबनराव पाचपुते अपयशी ठरले
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी करण्यासाठी बबनराव पाचपुते यांनी बरेच प्रयत्न केले. आघाडी एकसंध राहिल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. श्रीगोंद्यातही आमचाच उमेदवार विजयी होईल, असा माझा विश्वास आहे. जिल्हा परिषदेच्या निवडी बिनविरोध झाल्याने विरोधी पक्षालाही बरोबर घेऊन काम करू.ह्व अंकुश काकडे, पक्षनिरीक्षक, राष्ट्रवादी
त्यांना परिणाम भोगावे लागतील
मागील वेळी बबनराव पाचपुतेंमुळेच आम्हाला सत्तेपासून दूर राहावे लागले. आता आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही पाचपुतेंना याचे परिणाम भोगावे लागतील. सर्वांच्या एकीमुळे हे पद मिळाले. सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करणार आहे.ह्व
अण्णासाहेब शेलार, नूतन उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
सर्वांना बरोबर घेऊन काम करू
दक्षिण भाग दुष्काळी असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कर्जतला देऊन न्याय दिला आहे. जिल्हा परिषदेत काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी भूमिका राहील. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. जास्तीत जास्त विकासकामे व समाजहित डोळ्यासमोर ठेवून आदर्श काम करण्याचा मानस आहे.
पाचपुतेंना शह देण्यासाठी राजकारण
बबनराव पाचपुते यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपशी घरोबा केला. श्रीगोंदे मतदारसंघात त्यांना शह देण्यासाठी विधानसभा उमेदवारीच्या रेसमध्ये असलेल्या अण्णासाहेब शेलार यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. या वेळी बाळासाहेब नहाटा, राहुल जगताप आवर्जुन उपस्थित होते. या मतदारसंघात एकास एक उमेदवार देण्याची रणनिती राष्ट्रवादीने आखली असून हे सारे पाचपुतेंना शह देण्यासाठीच घडवून आणल्याचे काही सदस्य खासगीत सांगत होते.