आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या सभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड एकाकी पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे विविध घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी त्यांची कोंडी केली. अध्यक्ष सदस्यांत चांगलीच खडाजंगी झाली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (१९ सप्टेंबर) बोलावण्यात आली होती, परंतु उशिरापर्यंत अजेंड्यावरील एकाही विषयावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे स्थगित झालेली सभा मंगळवारी दुपारी तीन वाजता घेण्यात आली.

या सभेला उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती नंदा वारे, बाबासाहेब दिघे, शरद नवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे आदी उपस्थित होते. सभेला बोटावर मोजण्याइतकेच सदस्य हजर होते. परंतु स्थगित सभेला कोरमची अट नसल्याने ही सभा सुरू राहिली.

सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे सदस्य राजेंद्र फाळके यांनी कपाट घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. स्थायी समितीसमोर चौकशी अहवाल ठेवता परस्पर आयुक्तांना पाठवण्यात आला. हा अहवाल गोपनीय असल्याचे सांगून पत्रकारांसमोर जाहीर करण्यात आला. स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर चौकशी झाली, तरही अहवालच सदस्यांना दाखवला गेला नाही. वर्तमानपत्रांत मात्र बातम्या छापून आल्या. स्थायी सर्वसाधारण सभेसमोर अहवाल ठेवला नाही, हा सभेचा अवमान असल्याने तुम्ही काय कारवाई करणार, असा सवाल फाळके यांनी अध्यक्ष गुंड यांना केला. अधिकाऱ्यांना तुम्ही पाठिशी घालणार असाल, तर मी निषेध करतो. साप सोडून भुई कशाला धोपटता, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचेच सदस्य सुनील गडाख यांनी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद आहे का? असा सवाल केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांचा दोष नसताना त्यांना कपाट घोटाळ्यात बदनाम केले जात अाहे, असे ते म्हणाले. यावर अध्यक्ष गुंड निरुत्तर झाल्या.

तासभर तणावपूर्ण चर्चा सुरू होती. शाब्दिक चकमकही उडत होती. राष्ट्रवादीचे सुजित झावरे यांनीही हाच धागा पकडून अध्यक्षांना कोंडीत पकडले. त्यावर गुंड म्हणाल्या, सभागृहाने सांगावे, आपण कारवाई करू. त्यावर फाळके म्हणाले, आम्हाला विचारून तुम्ही अध्यक्षांची खुर्ची चालवणार आहात का? बराचवेळ ही शाब्दिक चकमक सुरूच होती. त्यानंतर गुंड यांनी अहवाल समोर ठेवला नाही, म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करू असे सांगितले. पुन्हा फाळकेंनी गुगली टाकून दीड महिना का कारवाई केली नाही, असा सवाल केला. सभेच्या सचिवांनी अध्यक्षांचा अवमान केला हे पहावत नाही, आम्ही राजीनामे देतो, असेही फाळके यांनी जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष गुंड यांनी या प्रकरणात ग्रामविकास मंत्र्यांकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करणार असल्याचे सांगितले. परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे दाखवत फाळके यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.

टँकरघोटाळ्यावरून पुन्हा झाली कोंडी
झावरे काँग्रेसचे बाळासाहेब हराळ यांनी टँकर घोटाळ्याच्या मुद्यावर अध्यक्षांना पुन्हा कोंडीत पकडले. टँकर घोटाळा झाला असताना बिले अदा कशी केली, असा सवाल त्यांनी केला. त्यावर कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम यांनी ऑडिटपूर्वी ७० टक्के आॅडिटनंतर उर्वरित ३० टक्के बिले दिली जाणार आहेत, असे सांगितले.

सभापती संदेश कार्ले यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. हराळ यांनी प्रशासनाने वेड्यात काढले असल्याचे सांगितले. कागदावरच ऑडिट करण्यात येते. गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाची शहानिशा कोणी करायची असा प्रश्न उपस्थित केला. मंजूरपैकी किती खेपा झाल्या, ज्या खेपा झाल्या नाहीत, त्याचीही बिले काढण्यात आली. कार्ले म्हणाले, टँकरच्या खेपा करताना जीपीएस मशीन मोटारसायकलला लावून फिरवले की टँकरला हा संशोधनाचा भाग असल्याचा टोला मारला. त्यावर अध्यक्षांनी आठ दिवसांनी टँकरच्या विषयावर पुन्हा सभा बोलावण्यास सांगितले.

राष्ट्रवादीच्या बहुतेक सदस्यांंनी अध्यक्षांची कोंडी केली. त्यात काँग्रेसचे सदस्यही होते. जिल्हा परिषदेत सुरू असलेला गोंधळ आणि विसंवाद यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

तुम्ही राजीनामे देता का, आम्ही देऊ...
कपाट घोटाळ्याचा अहवाल परस्पर आयुक्तांना पाठवला. तो आम्हाला दाखवलाच नाही. यावर काय कारवाई करणार ते सांगा; अन्यथा तुम्हीच राजीनामा देऊन टाका, नाहीतर आम्हाला सांगा राजीनामा द्यायला, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे सुनील गडाख यांनी केला.

कपाट घोटाळ्याची व्यंगचित्रे सदस्य अॅड. आझाद ठुबे यांनी सभागृहात वाटली. त्यावर अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी परस्पर काय वाटप केले, असा संतप्त सवाल केला. मी पीठासीन अधिकारी असताना माझ्या परवानगीशिवाय तुम्ही का वाटप केले. हा माझा अवमान नाही का, असे म्हणत कागद फेकून देण्याचे आदेश दिले. अध्यक्ष भडकल्यानंतर काँग्रेसचे सदस्य प्रवीण घुले यांनी घोटाळा झाल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना अवमान केल्याचा काय प्रश्न आहे, असे विधान केले. घुले, ठुबे हे देखील भडकल्यानंतर विठ्ठल लंघे यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

जातवैधतेसाठी अंतिम नोटिसा
जातवैधता दिल्याने बिंदुनामावली रखडली अाहे. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना अंतिम नोटिसा बजावल्याचे सांगितले. त्यावर राजेंद्र फाळके यांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सभेत केली.
बातम्या आणखी आहेत...