आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूने मृत्यू झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांचा सीईओंना इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात डासांचा उपद्रव वाढला असून सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळीच डेंग्यूचे निदान न झाल्याने वर्षभरात ग्रामीण भागातील 9 संशयित, तर शहरातील 2 निदान झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुढील काळात डेंग्यूने कोणाचा मृत्यू झाल्यास मुख्य कार्यकारी अधिका-यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा सदस्यांनी दिला.
जिल्ह्यात डासअळ्या प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये लोकसहभाग नसल्याने डासांवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले आहे. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून एडिस एजिप्ती डासांच्या संक्रमणात्मक चाव्यामुळे या आजाराचा प्रसार होतो. हा रोग डेंग्यू ताप व डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) या दोन प्रकारांत आढळतो. ताप येणे, डोक्याचा पुढील भाग दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छातीसह इतर अवयवांवर पुरळ येणे, उलट्या होणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. या डासांच्या अळ्यांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तूंमध्ये साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे या डासांचा उपद्रव थांबवण्यासाठी लोकसहभागाशिवाय पर्याय नाही.
ग्रामीण भागात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत संशयित आढळून आलेल्या 934 रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी 123 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यात नगरपालिका हद्दीतील 20, ग्रामीण स्तरावरील 98, तर जिल्ह्याबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. याच कालावधीत नगर शहरातील 276 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी 11 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले, असे महापालिका आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आतापर्यंत डेंग्यूने ग्रामीण भागात 9 डेंग्यूसदृश, तर एका निदान झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातही एकाचा मृत्यू झाला.
ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी डेंग्यू तपासणीची यंत्रणा नाही. त्यामुळे सुरुवातीला रुग्णाला तापावरील औषधे देऊन उपचार केले जातात. रुग्णाची प्रकृती आणखी खालावल्यास त्याला पुढील तपासणीसाठी शहरात अथवा ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले जाते. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. त्या रुग्णालयांनी डेंग्यूचे निदान झाल्याचा अहवाल दिला, तर शासकीय आरोग्य यंत्रणा ते मान्य करायला तयार नसते. त्यामुळे त्या रुग्णाचे पुन्हा सॅम्पल तपासणीसाठी घेतले जाते. एखादा रुग्ण दगावल्यास त्याचा सॅम्पल उपलब्ध नसतो. अशावेळी रुग्ण रहात असलेल्या परिसरातही डासअळ्यांची पाहणी केली जाते. या वेळखाऊ पद्धतीमुळे रुग्णाचे निदान होण्यास विलंब होतो. ग्रामीण भागात आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. तथापि, रुग्णांची संख्या महिन्याभरात वाढल्याने जिल्हा परिषद सदस्य आक्रमक झाले आहेत. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात डेंग्यू व इतर आजारांनी थैमान घातले असून नागरिक भयभीत झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला याचे गांभीर्य नाही. ग्रामपंचायतींनी फवारणी करणे, गटार उपसणे, तसेच संपूर्ण स्वच्छता करण्याची गरज आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात; अन्यथा पुढील काळात डेंग्यूने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
त्यालाच पहिला चावा
आपल्या दुर्लक्षामुळे घरात किंवा घराच्या आसपास साठलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येतात. त्यासाठी आठवड्यात एखादा कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याने कोरडा दिवस पाळण्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही. जो माणूस अशा अळ्या वाढवतो, त्यालाच या डासांचा पहिला चावा सहन करावा लागतो. त्यामुळे जनतेने डास नियंत्रणात सहकार्य करावे.''
बी. बी. घुसळे, जिल्हा हिवताप अधिकारी.
मागील वर्षी बारा मृत्यू
मागील वर्षी (2013) डेंग्यूचा उद्रेक जिल्हाभरात झाला होता. त्यावेळी वर्षभरात सुमारे 12 रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. मागील अनुभव असतानाही डेंग्यूचे रुग्ण नियंत्रणात आलेले नाहीत. केवळ आरोग्य विभागाने सूचना देऊन प्रश्न सुटणार नाही. लोकांनीही सूचनांची अंमलबजावणी केली, तरच प्रश्न सुटेल असे आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यानी सांगितले.