नगर- तक्रारी आल्या तरच कारवाई होईल, या भ्रमात शिक्षण संस्थाचालकांनी राहू नये. प्रवेशासाठी डोनेशन घेणाया संस्थांवर कारवाई करू, असा इशारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी परसराम पावसे यांनी बुधवारी दिला.अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उपशिक्षणाधिकारी के. एन. चौधरी, शिवाजी शिंदे, उच्च माध्यमिक शिक्षण निरीक्षक अलका कांबळे, जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.
पावसे म्हणाले, प्रवेश शुल्क घेऊ नये असे शासनाचे परिपत्रक आहे. तरीही बहुतांश महाविद्यालये प्रवेश शुल्क व डोनेशन घेतात. तक्रार आल्यानंतरच कारवाई होईल, या भ्रमात कोणी राहू नये. वस्तुस्थिती तपासून स्वत:हून कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पारदर्शक व गुणवत्तेला अनुसरून प्रवेश प्रक्रिया राबवावी.
उपशिक्षणाधिकारी चौधरी म्हणाले, अँटी कॅपिटेशन अॅक्टनुसार डोनेशन उकळणा-यांविरुद्ध कारवाईची तरतूद आहे. माहितीपुस्तक व प्रवेश अर्जांसाठी आकारण्यात येणारे शुल्क प्रवेशाच्या वेळी घेऊ नये. अनुदानित तुकड्यांसाठीची प्रवेश क्षमता संपल्याशिवाय विनाअनुदानित तुकड्यांसाठी प्रवेश देऊ नयेत. अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठी डोनेशन घेणे थांबवावे; अन्यथा कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले. संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गुरुवारपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. प्रवेश फी, माहिती पुुस्तिका विद्यार्थ्यांना देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या माध्यामिक विभागाकडे आल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल.
आजपासून सुरू होणार अकरावीची प्रवेशप्रक्रिया
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला गुरुवारपासून (19 जून) सुरुवात होत आहे. 19 ते 26 जूनदरम्यान प्रवेश अर्जांची विक्री व स्वीकृती, 27 ते 28 जूनदरम्यान सर्व अर्जांचे संगणकीकरण, 30 जूनला विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 1 जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादीवर हरकती स्वीकारल्या जातील. दुरुस्तीनंतर 2 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 3 ते 5 जुलैदरम्यान प्रवेश देण्यात येतील. 7 जुलैला पहिली प्रतीक्षा यादी प्रसिद्ध व 8 ते 9 जुलैदरम्यान या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. 10 जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करून 11 , 12 जुलैला या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. 14 जुलैला तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर करून 15 जुलैला त्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. 16 ते 19 जुलै दरम्यान शिल्लक असलेल्या जागांवर फक्त एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतील. 21 जुलैपासून अकरावीच्या सर्व शाखांच्या अध्यापनास सुरुवात होईल.