आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम डावलून जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया, जि. प. सदस्य संभाजी दहातोंडे यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेतील शिपाई भरतीत मराठा आरक्षणाच्या जागा नियमबाह्य भरण्यात आल्या असून त्यात इतर अनुशेष दाखवण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करून भरती रद्द करण्याची मागणी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जि. प. आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्त्याखालील विविध विभागांत वर्ग चार संवर्गाच्या पदांसाठी ऑगस्ट २०१४ मध्ये सरळसेवा भरती झाली. ६१ जागांची भरती करताना प्रवर्गनिहाय रिक्त जागा दाखवण्यात आल्या होत्या. महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन कर्मचारी अशी वर्गवारी करण्यात आली. त्यात समांतर आरक्षण विरहित २३ जागा दाखवण्यात आल्या होत्या. त्याबरोबरच नव्याने लागू झालेल्या मराठा आरक्षणानुसार ईएसबीसी प्रवर्गासाठी १० जागांचे आरक्षण होते. यासंदर्भात दहातोंडे म्हणाले, आरक्षणाच्या जागा बिंदू नामावलीप्रमाणे भरती झाली नाही. आरक्षण असूनही मराठा आरक्षणाचा लाभ मिळत नाही. अपंग, तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र राखीव जागा असताना मराठा आरक्षणात त्यांचा समावेश केला. या भरतीत गोंधळ झाला असून याप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार केली जाईल. अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून भरती स्थगित ठेवण्याची मागणी करणार असल्याचे दहातोंडे यांनी सांगितले.