आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा मृत्यू झाल्यास प्रशासन जबाबदार, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याची तंबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेतील चित्र शाखेतील रिक्त पदांमुळे कामांचा अतिरिक्त भार वाढल्याची तक्रार मुख्य आरेखक बी. एल. कोळी यांनी कार्यकारी अभियंत्याकडे केली असून अतिरिक्त भारामुळे ताण वाढून मृत्यू आल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम विभागात चित्र शाखा आहे. या शाखेत कनिष्ठ आरेखक, आरेखक, मुख्य आरेखक विस्तार अधिकारी सांख्यिकी ही चार पदे रिक्त आहेत. त्यामुळे या शाखेत मुख्य आरेखक कोळी यांच्यावर संपूर्ण शाखेच्या कामाचा ताण पडतो आहे. तीन महिन्यांपूर्वी टंकलेखनासाठी सहायक कर्मचारी देण्यात आले होते. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला टपाल कक्षाकडे वर्ग करण्यात आले. वारंवार तोंडी लेखी सहायक कर्मचारी देण्याची मागणी करूनही दखल घेतली जात नाही. कोळी यांचे वय ५० असून कामाच्या अतिरिक्त भारामुळे त्यांच्यावर ताण वाढला आहे. त्यांना यापूर्वी दोन वेळा हृदयविकाराचा त्रास झाला आहे. प्रशासकीय कामकाजातील विलंबाला मी वैयक्तिक जबाबदार राहणार नाही, तसेच कामाचा ताण वाढून अपघात किंवा अन्य कारणांनी मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल, असे कोळी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोळी यांना सहायक कर्मचारी देण्यास कार्यकारी अभियंता, तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. भविष्यात हे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पदाधिकारी अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे शाखेतील पाचपैकी चार पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजातही दिरंगाई होत आहे. आवश्यक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.