नगर - जिल्हा परिषदेच्या मागील स्थायी समितीच्या सभेत स्थगित ठेवलेल्या विषयांना इतिवृत्तात परस्पर मंजुरी दिल्याची नोंद करण्यात आली, असा आरोप करून अध्यक्ष मंजूषा गुंड सचिवांना सदस्यांनी कोंडीत पकडण्यात आले. जि. प. पदाधिकारी सदस्य यांच्यात विविध कारणांवरून धुसफूस सुरू असल्याने नियमांना डावलून कार्यवाही केली जात असल्याचे गुरुवारी समोर आले.
स्थायी समितीच्या मागील सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यातील आठ-नऊ विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीच्याही अध्यक्ष आहेत. सभा झाल्यानंतर कामकाजाचे इतिवृत्त तयार केले जाते. पुढील सभेच्यावेळी विषयांसह इतिवृत्त समितीच्या सदस्यांना कळवले जाते. त्यानुसार बुधवारी (१३ एप्रिल) नियोजित सभेचे इतिवृत्त पाहिल्यानंतर सदस्य राजेंद्र फाळके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जे विषय समितीने स्थगित केले, ते इतिवृत्तात मंजूर कसे झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे अध्यक्षांसह समितीचे सचिवही कोंडीत सापडले आहेत, जर विषय मंजुरीसंदर्भात तातडीचे निर्णय घ्यायचे असतील, तर विशेष सभा बोलावता येते. परंतु लोकशाही मार्गाने चालणाऱ्या सभागृहात लोकप्रतिनिधींनी घेतलेला निर्णयच इतिवृत्तात बदलण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वीही दोन पदाधिकाऱ्यांत निधीच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक झाली होती. सदस्यांकडूनही कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यातच फाळके यांनी इतिवृत्तातील बदलावर आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. सामोपचाराने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी इतर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही. अध्यक्ष गुंड सदस्य फाळके एकाच तालुक्यातील आहेत. त्यामुळे हा वाद उदभवण्यामागे राजकीय समीकरणे असल्याचीही चर्चा रंगली आहे. चर्चा काहीही असली, तरी इतिवृत्तात परस्पर बदल होणे ही बाब रुचणारी नसल्याचे बोलले जात आहे.
फाळके म्हणाले, मार्चमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आठ-नऊ विषय स्थगित ठेवण्यात आले होते. या महिन्याच्या सभेचा अजेंडा आला त्याबरोबर इतिवृत्त पाहिले. त्यात स्थगित विषयांना मंजुरी दिल्याचे दिसून आले. याप्रकरणी जबाबदारांवर काय कारवाई करायची याचे कायदेशीर ज्ञान मला आहे. कारभार नियमाने चालवा एवढीच अपेक्षा आहे. सध्या आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय अशी जिल्हा परिषदेची अवस्था आहे. नियमांचा कुणीही अभ्यास करायला तयार नाही. यासंदर्भात अध्यक्ष गुंड यांना विचारणा केली असता त्यांनी सदस्यांना फोनवर विचारले होते, असे सांगितले. ज्या समितीला अधिकार आहेत, त्या अधिकारांचा अवमान करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
मला दिलेल्या अधिकाराचा वापर मी केला...
^निधी अखर्चित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मला अधिकार बहाल करण्यात आले होते. त्या अधिकारांचा वापर करून विषयांना मंजुरी दिली. आम्ही सदस्यांना विश्वासात घेऊनच कारभार करतो. निधी अखर्चित राहू नये असाच प्रयत्न आहे.'' मंजूषा गुंड, अध्यक्ष,जिल्हा परिषद.
तहकूब सभा २० ला
बुधवारी (१३ एप्रिल) स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, सभेसाठी प्रमुख अधिकारीच उपस्थित नसल्याने विविध विभागांचा आढावा घेणे शक्य झाले नसते. त्यामुळे ही सभा तहकूब करून २० एप्रिलला घेण्याचे ठरले.