आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council,Green India,latest News In Divya Marathi

जि.प.सभापतींच्या आज निवडी, विधानसभेत आघाडी तुटल्याने निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याणसह इतर दोन विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवड शनिवारी (4 ऑक्टोबर) होणार आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये फारकत झाल्याने त्याचा परिणाम या निवडींवरही होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत मागील अडीच वर्षे राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना एकत्रित सत्तेवर होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शिवसेना व भाजपला बाजूला करा, अशी मागणी लावून धरली होती. परंतु राष्ट्रवादीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसने एकत्रित बैठका घेऊन जिल्हा परिषदेत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीकडे अध्यक्ष, तर काँग्रेसकडे उपाध्यक्षपद अशी वाटणी झाली. जिल्हा परिषदेत एकूण 75 जागा असून काँग्रेसकडे 28 व राष्ट्रवादीकडे 32 जागा आहेत. दोन्ही काँग्रेसच्या संमतीने, तसेच विरोधी पक्षांनी सहकार्य केल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाली. त्यानंतर मात्र प्रदेशपातळीवर जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये बिनसले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची फारकत होऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीत परस्पर विरोधी उमेदवार उभे केले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील आघाडीसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात बिघाडी झाली असली, तरी जिल्हा परिषदेतील आघाडी शाबूत राहील, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. तथापि, जिल्हा परिषदेत एकत्र सत्तेवर असलेले सदस्य मात्र विधानसभेच्या प्रचारात स्वतंत्र व्यासपीठावर बसत आहेत. त्यामुळे सभापती निवडीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत सभापती निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
अशी असेल निवडीची प्रक्रिया
जिल्हा परिषद सभागृहात सकाळी अकरा ते एकपर्यंत सभापतिपदांसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. तीन वाजता छाननी, माघार व आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येईल. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडींप्रमाणे सभापति- पदांच्याही निवडीही स्थानिक पातळीवरील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या समन्वयाने बिनविरोध होण्याची शक्यता आहे.