आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेमध्ये लगेच ‘दुरुस्ती’ करा- विनायक देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा झालेला विश्वासघात कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादीने ही चूक दुरुस्त केल्याशिवाय दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार नाही. ही दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करणारे निवेदन काँग्रेसच्या केंद्र-राज्य सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवले आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित होण्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे आवश्यक आहे. एका मोठय़ा पुष्पहारात दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन उपयोग होणार नाही. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडताना राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपला सोबत घेऊन काँग्रेसची फसवणूक केली. उपाध्यक्षपदाच्या निवडीत मोनिका राजळे यांनी बंडखोरी करून काँग्रेसचा विश्वासघात केला. दुर्दैवाने मोनिका यांचे पती राजीव राजळे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. नगर, र्शीगोंदे, कर्जत, राहुरी या तालुक्यांमध्ये मोठा संघर्ष करून काँग्रेसचे सदस्य निवडून आले. मात्र, हातातोंडाशी आलेली सत्तेची संधी राजळे यांच्या बंडखोरीमुळे हिरावली गेली. हे शल्य काँग्रेस कार्यकर्त्यांना बोचत आहे. काँग्रेसचा विश्वासघात कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून कितीही मेळावे किंवा गाठीभेटी घेऊन कार्यकर्त्यांची नाराजी दूर होणे शक्य नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रवादीच्या पक्षर्शेष्ठींनी मोनिका राजळे यांचा राजीनामा घेऊन दक्षिण भागातील काँग्रेस कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, पालकमंत्री मधुकर पिचड यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे. देशमुख यांचे निवेदन व त्याची जाहीर वाच्यता झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राजळे यांच्या विरोधातील भावना तीव्र होणार आहेत.