आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपसी’च्या गैरसोयीवर ‘अंशत:’ बदलाचा उपाय, बदल्यांसाठी मास्तरांनी झिजवले मंत्रालयाचे उंबरठे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- इतर जिल्ह्यांतून नगर जिल्ह्यात आपसी बदलीने येणारे शिक्षक नियुक्तीच्या जागेवर हजर न होता, सोयीसाठी अंशत: बदलाची मागणी करत आहेत. त्यासाठी अनेक शिक्षकांनी मंत्रालयात चकरा मारणे सुरू केले असून शिफारशीही आणल्या आहेत. त्यामुळे अंशत: बदलाच्या नावाखाली सारे आलबेल सुरू असून त्याला जिल्हा परिषद प्रशासनाचाही आशीर्वाद मिळत आहे.
जिल्हाभरात समायोजन तसेच पदोन्नतीने रिक्त होणाºया सुमारे 250 जागांवर इतर जिल्ह्यातील शिक्षकांचा डोळा आहे. या जागांवर नियुक्ती मिळवण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबरोबरच इतर जिल्ह्यातून आपसी बदलीने जिल्ह्यात येणाºया शिक्षकांचीही संख्या वाढत आहे. आपसी बदलीसाठी दोन्ही जिल्हा परिषदांची मान्यता आवश्यक आहे. त्याबरोबरच संबंधित कर्मचारी हा ज्या प्रवर्गातील असेल त्याच प्रवर्गातील इतर जिल्हा परिषदेचा कर्मचारी नगर जिल्ह्यात येण्यास इच्छुक हवा. दोघांच्या सहमतीने तसेच दोन्ही जिल्हा परिषदांच्या मान्यतेने आपसी बदली एकमेकांच्या जागांवर केली जाते. इतर जिल्ह्यांतून येणाºया शिक्षकासाठी ही जागा गैरसोयीची असेल, तर तो शिक्षक या जागांवर हजर होत नाही. हजर होण्यापूर्वी अंशत: बदल करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांना आहे. त्यानुसार शिक्षक या जागांवर हजर न होता, सोयीची जागा मिळावी यासाठी अंशत: बदलासाठी प्रयत्न करीत आहेत. अंशत: बदलामुळे सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते. याची जाणीव असल्याने शिक्षकांनी थेट मंत्रालयात धाव घेतली आहे.
ग्रामविकास खात्याकडून संबंधित शिक्षकांच्या अंशत: बदलासाठी शिफारशी जिल्हा परिषदेला पाठवल्या जात आहेत. या शिफारशीनुसार अंशत: बदल करण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. अंशत: बदल करायचेच असतील, तर सर्वच इच्छुक शिक्षकांचे करावे. त्यासाठी प्रशासनाने आढेवेढे घेऊ नयेत, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी घेतली आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह सामान्य प्रशासन विभागातही शिक्षक गर्दी करत आहेत. सोयीनुसार अंशत: बदल होऊ लागल्याने काही शिक्षक आनंदात आहेत. काहींची मंत्रालयापर्यंत पोहोच नसल्याने त्यांना शिफारशीअभावी या बदलाला मुकावे लागत आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषद सदस्य आक्रमक झाले आहेत. शिक्षक बदलीवरून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.

सीईओंनी लेखी द्यावे
अंशत: बदलासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडून शिफारसपत्र आणण्यासाठी शिक्षकांचा आटापिटा सुरू आहे. तथापि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल जर या पत्रानुसार बदल करणार नसतील, तर शिफारशीला काय अर्थ आहे. त्यांना अंशत: बदलासाठी जर मंत्रालयाच्या कक्ष अधिकाºयांचे पत्र हवे, असेल तर त्यांनी तसे लेखी द्यावे. ग्रामविकास मंत्र्यांनीही शिफारशी देऊ नये, असे कळवावे.’’ संभाजी दहातोंडे, सदस्य, जिल्हा परिषद.