आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक खोल्या पाडण्यासाठी जानेवारी अखेरचा "अल्टिमेटम', शिक्षण समितीच्या सभेत शेलार यांचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आतापर्यंत जिल्ह्यातील ८० धोकादायक वर्गखोल्या पाडण्यात आल्या असून उर्वरित २२० खोल्या जानेवारीअखेर पाडाव्यात, असा अल्टिमेटम दिला आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या सभेत उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सोमवारी दिली. आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, तर संबंधितावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळाखोल्या तातडीने पाडाव्यात, यासाठी "दिव्य मराठी' दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा सोमवारी दुपारी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेलार यांनी धोकादायक शाळाखोल्यांच्या निर्लेखनाचाही आढावा घेतला. जिल्ह्यातील ८० शाळांमधील ३०० खोल्या धोकादायक असल्याने त्या पाडण्याचे आदेश शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. तथापि, अजूनही २२० वर्गखोल्या पाडण्यात आलेल्या नाहीत.
या खोल्यांचे मूल्यांकन झाले असल्याने केवळ लिलाव करून पाडण्याचे काम बाकी आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने या खोल्या पाडण्यास दिरंगाई होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आले आहे.उर्वरित खोल्या जानेवारीअखेर पाडाव्यात, असे आदेश शेलार यांनी यावेळी दिले.
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले, जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक वर्गीय अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करून तातडीने कार्यवाही केली जाईल.
40 ठिकाणी गरज नसताना खोल्या
जिल्ह्यात नव्याने १०० वर्गखोल्या बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. यापैकी ४० ठिकाणी गरज नसताना खोल्या मंजूर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी धोकादायक खोल्या पाडायच्या आहेत व जेथे पर्यायी बसण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी प्राधान्याने या खोल्या मंजूर करून बांधण्यात येतील, असेही उपाध्यक्ष शेलार यांनी सांगितले.