आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा एप्रिल अखेर तळ गाठणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे हे मोठे प्रकल्प वगळता 18 मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. भंडारदरा, मुळा व निळवंडे धरणात पाणी असले, तरी सध्याचा वापर पाहता या तिन्ही धरणांमधील पाण्याची पातळी एप्रिलअखेर मृतसाठय़ापर्यंत जाईल. तसे झाले, तर मे महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्याला प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे आतापासूनच योग्य नियोजन करून पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात सलग दोन वर्षे पाणीटंचाई निर्माण झाली. यंदा तर जनतेला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे.
15 मार्चपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिन्ही धरणांत मिळून एकूण 14 हजार 771 दशलक्षघनफूट (म्हणजे 39.26 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. त्यापैकी 9 हजार 836 दलघनफूट एवढाच साठा उपयुक्त आहे. पुढील काळात राजकारण्यांच्या आग्रहावरून शेतीसाठी आवर्तन सोडले, तर एप्रिलपर्यंत या तिन्ही धरणांमध्ये केवळ मृतसाठा उरेल, असा अंदाज आहे.

शहरांची अवस्था फारशी वेगळी नाही. नगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात सध्या 8 हजार 850 दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे. मृतसाठा 4500 दशलक्ष घनफूट आहे. म्हणजे सध्या धरणात 4 हजार 350 दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा आहे. भंडारदरा धरणात सध्या 3 हजार 427 दशलक्ष घनफूट साठा आहे. त्यापैकी 3 हजार 127 दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा सोडला, तर या धरणातही मृतसाठाच शिल्लक उरतो. निळवंडे धरणात सध्या 2 हजार 494 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यापैकी 2 हजार 359 दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा आहे. आवर्तन सोडल्यास तिन्ही धरणांत केवळ मृतसाठाच उरणार आहे. त्यामुळे मे महिन्यात दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होतील.

आढळा मध्यम प्रकल्पात 205, मांडओहोळ प्रकल्पात 48, खैरी प्रकल्पात 3 व विसापूर प्रकल्पात 16.92 दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे. उर्वरित मध्यम प्रकल्प व जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधण्यात आलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे देखील केव्हाच कोरडे पडले आहेत. त्यामुळे पावसाची वाट पाहण्याशिवाय जनतेला दुसरा पर्याय नाही.

पाण्याचा जपून वापर करावा
गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला होता. सध्या होत असलेला वापर व बाष्पीभवनाचा विचार करता यंदाही एप्रिलच्या अखेरीस धरणे तळ गाठतील, अशी शक्यता आहे. आतापासूनच उपयुक्त पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन केले, तर जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. धरणांमध्ये शिल्लक असलेले पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे. तिन्ही धरणांच्या मृतसाठय़ातून जिल्ह्यातील जनतेची दोन महिने पिण्याच्या पाण्याची गरज भागेल. त्यानंतर मात्र दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होतील.
15 मार्चपर्यंतचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूटमध्ये)
धरण क्षमता मृतसाठा उपलब्ध साठा उपयुक्त साठा
मुळा 26,000 4,500 8, 850 4,350
भंडारदरा 11,039 300 3, 427 3,127
निळवंडे 8,047 135 2,494 2,359
मार्चमध्येच 18 तलाव कोरडेठाक
जिल्ह्यातील 33 लघू प्रकल्पापैकी पारनेरमधील पळशी व काळू, अकोल्यातील बोरी, बेलापूर बदगी, सांगवी, वाकी, कोथळे, घोटी, शिरपुंजे, बलठण, अबीत, टिटवी, पाडोशी, संगमनेरमधील केळेवाडी, अंबी दुमाला वगळता इतर 18 तलाव कोरडे पडले आहेत. 15 तलावांत नाममात्र पाणी आहे.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
जुलैच्या सुरुवातीला जिल्ह्यात पाऊस सुरू होतो. त्यामुळे सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेले पाणी आणखी किमान तीन महिने पुरेल, असे काटेकोर नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी, चारानिर्मिती, तसेच बियाणे तयार करण्यासाठी व उद्योगांसाठी अशा प्राधान्यक्रमाने वापरावा. कारण जिल्ह्यातील उद्योगधंदेही टिकले पाहिजेत. उद्योजकांची बैठक घेऊन पाणीसाठय़ाची वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून द्यावी. त्यांना मिळणार्‍या पाण्याचा पुनर्वापर करण्याची विनंती करावी. उसाचे बियाणे तयार करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.’’ पोपटराव पवार, आदर्श गाव कृती समिती, अध्यक्ष.
तूर्तास कपातीची गरज नाही
नगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शहरातील पाणी वितरणात अद्याप अडथळा आलेला नाही. लगेचच नगर शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही. भविष्यात तीव्र अडचण निर्माण झाली, तर मात्र बैठक घेऊन पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल. औद्योगिक वसाहतींमध्येही सध्यातरी पाणी टंचाईचे संकट जाणवत नाही. भविष्यात पाणीटंचाई तीव्र झाली, तर उद्योजकांची बैठक घेऊन उद्योगासाठी लागणार्‍या पाण्याचेही काटेकोरपणे नियोजन केले जाईल. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.’’ डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी.
असे वाचवा पाणी..
* पिण्यासाठी गरजेएवढेच पाणी वापरा.
* घरातील सांडपाणी झाडांना घाला.
नळ सोडून ओंजळीने पाणी पिणे टाळा.
* सार्वजनिक ठिकाणी फिरकीऐवजी दाब नळाचा वापर करा.
* शाळा, कॉलेज, शेजारीपाजारी, शासकीय कार्यालयांत पिण्याचे पाणी वाया न जाऊ देण्याची विनंती करा.
* बंद करूनही वाहत असलेले नळ ताबडतोब दुरूस्त करा.
* नवीन नळाचे कनेक्शन घेताना पाणी कमी लागेल, असे कनेक्शन बसवा.
* पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे पाण्याचा थेंबन् थेंब जपून वापरा.