आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून होतेय लाखो रुपयांची उधळपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्वयंपाकघराच्या बांधकामाला संरक्षण देण्यासाठी पक्क्या पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. अवैधपणे पाडलेल्या भिंती बांधून अटकाव करण्याचा सोपा पर्याय वगळून पत्र्याच्या शेडवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. रुग्णालयाच्या या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या स्वयंपाकघराची दोन मजली इमारत बांधण्यासाठी शासनाने 5 कोटींचा निधी वर्ग केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे बांधकाम होणार आहे. बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी बाजूने पत्र्याचे कंपाउंड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दहा कोटींपेक्षा अधिक खर्च करून विविध इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यावेळी आताप्रमाणे पत्र्याचे कंपाउंड उभारून बांधकाम क्षेत्र संरक्षित करण्याची कल्पना रुग्णालय प्रशासन व बांधकाम विभागाला सूचली नव्हती.
तारकपूर रस्त्याच्या बाजूची भिंत व अप्पू चौकाकडे जाणार्‍या रस्त्याची भिंत तोडून अवैध ‘शॉर्टकट’चा वापर नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग बंद करण्याचा पर्याय रुग्णालय व बांधकाम विभागाकडे होता. मात्र, तो टाळून कंपाउंडवर लाखोंची उधळपट्टी सुरू आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक खैरे यांनी उडवाउडवीची उत्तरे देत कनिष्ठ अधिकार्‍यांना यासंदर्भात माहिती असल्याचे सांगितले.

चोर्‍यांवर उपाययोजना
बाजूने पत्र्याचे शेड उभारून बांधकाम करण्याची पद्धत प्रचलित आहे. सर्वत्र या पद्धतीचा वापर केला जातो. बांधकामाचे साहित्य, सिमेंट, स्टील चोरी जाण्याचा धोका टाळण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.’’ संजय राठोड, प्रशासन अधिकारी, जिल्हा रुग्णालय.

कचखाऊ धोरण
जिल्हा रुग्णालयाची तोडलेली संरक्षक भिंत बांधण्याचे यापूर्वी केलेले चार-पाच प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. प्रत्येकवेळी करण्यात आलेले तात्पुरते बांधकाम पाडून ‘शॉर्टकट’ अबाधित ठेवण्यात येतो. मात्र, संबंधितांविरुद्ध साधी तक्रार करण्याचे धाडस प्रशासनाला दाखवता आलेले नाही.