आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी होतेय मेट्रो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रूपांतर मेट्रो (महानगर) रक्तपेढीत होत आहे. रक्ताबरोबरच रक्तघटकही तेथे उपलब्ध होतील. तीन हजार रक्तपिशव्या सुरक्षित ठेवण्याची सुविधा येथे उपलब्ध होईल, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एस. कांबळे यांनी दिली.

कार्ल लॅडस्टिनर या शास्त्रज्ञाच्या जन्मदिनी 14 जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. 14 जून ते 14 जुलैदरम्यान जागतिक रक्तदाता महिना साजरा केला जातो. या महिन्याचे यावर्षीचे घोषवाक्य ‘सुरक्षित रक्त मातांना वाचवते,’ असे आहे. सुरक्षित रक्त व रक्तघटक उपलब्ध करून माता मृत्यूदर कमी करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विज्ञानाच्या साहाय्याने कितीही प्रगती केली, तरी मानवी रक्ताला पर्याय उपलब्ध करणे शक्य झालेले नाही. अपघातातील रुग्ण, गरोदर माता, थॅलेसिमिया रुग्णांना रक्ताची तातडीची गरज भासते. ही गरज केवळ रक्तदात्यांमुळेच भागवता येणे शक्य आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रूपांतर मेट्रो रक्तपेढीत होत आहे. मेट्रो रक्तपेढीसाठी आवश्यक यंत्रसामग्री वाढवण्यात आली असून तीन हजार रक्तपिशव्यांची साठवण क्षमता तेथे असेल. या ठिकाणी रक्त व रक्तघटक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे डॉ. कांबळे म्हणाले. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत शनैश्वर देवस्थानच्या सहकार्याने शनिशिंगणापूर येथे दर शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यातून वर्षभरात 1000 ते 1200 रक्तपिशव्यांचे संकलन होते. मेट्रो रक्तपेढीची क्षमता व गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील सामाजिक संस्था, महाविद्यालये, विविध कार्यालयांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विद्या शिंगारे यांनी केले आहे.
जीवन अमृत सेवा
जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीपासून 40 किमीवरील रुग्णालयांत रक्त व रक्तघटक पोहोच केले जाते. जीवन अमृत सेवा योजनेच्या माध्यमातून ही सुविधा सहा महिन्यांपासून पुरवण्यात येते. त्यासाठी 104 हा टोल फ्री क्रमांक आहे. आतापर्यंत 123 रक्तपिशव्या पोहोच झाल्याची माहिती देण्यात आली.